News Flash

गुंतवणुकीच्या परतावा कामगिरीत मालमत्ता विभाजनाची मोठी भूमिका

रोखेसंलग्न गुंतवणूकही वेगवेगळ्या मुदतपूर्तीच्या रोखे फंडात गुंतविला होता.

प्रतिनिधिक छायाचित्र

मुंबई : वेगवेगळ्या कालावधी व बाजार चक्रानुरूप, भिन्न मालमत्ता प्रकारांची कामगिरी वेगवेगळी राहत असल्याने मालमत्ता विभाजनाच्या तत्वाचा सल्ला वित्तीय नियोजनकारांकडून दिला जातो, तर पहिल्यांदाच म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांना समभागसंलग्न अ‍ॅसेट अलोकेटर फंडात गुंतवणुकीचा सल्ला दिला जातो.

गुंतवणुकीतील यशाचे मूळ असलेल्या मालमत्ता विभाजनाच्या तत्त्वाचे सामान्य गुंतवणूकदारांकडून पालन शिस्तीने आणि वेळेत होणे अशक्य असल्याने, अनेक म्युच्युअल फंड घराण्यांनी अ‍ॅसेट अलोकेटर योजना प्रस्तुत केल्या असून त्यांना प्रतिसादही चांगला मिळताना दिसत आहे. किंबहुना, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल आणि फ्रँकलिन इंडिया यांनी या गटात ‘फंड ऑफ फंड्स’ प्रकारात योजना गुंतवणूकदारांसाठी आणल्या आहेत. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल अ‍ॅसेट अलोकेटर फंड ऑफ फंड्समधील १९ नोव्हेंबपर्यंत एकूण मालमत्ता ४,३७२ कोटी रुपये, तर त्याच वेळी फ्रँकलिन इंडिया डायनॅमिक अ‍ॅसेट अलोकेशन फंड ऑफ फंड्सची मालमत्ता १,०२१ कोटी रुपये अशी आहे.

आयसीआयसीआय प्रु.च्या अ‍ॅसेट अलोकेटर फंडाने वर्षभरात ९.८९ टक्के, तीन वर्षांत ११.०९ टक्के परतावा गुंतवणूकदारांना दिला आहे. तर या अवधीसाठी फ्रँकलिन इंडियाच्या फंडाची परतावा कामगिरी अनुक्रमे ७.११ टक्के आणि ८.६ टक्के आहे. एकाच प्रकारच्या फंडातून परतावा कामगिरीतील या तफावतीची उकल अर्थलाभ डॉट कॉमने केली आहे.

आयसीआयसीआय प्रु.च्या फंडातून ऑक्टोबरअखेपर्यंत समभागसंलग्न गुंतवणुकीचे प्रमाण ४६.१ टक्के तर जवळपास ५४ टक्के गुंतवणूक ही रोखेसंलग्न होती. एकंदर अर्थचक्र मंदावले असताना आणि व्याजदरही संकोचत असताना रोखे बाजारातील गुंतवणूक फलदायी ठरते, हेच यातून अधोरेखित होते. आयसीआयसीआय प्रु.च्या फंडाने समभागसंलग्न गुंतवणुकीला दोन भागांत विभागून, १९.९ टक्के आयसीआयसीआय प्रु. लार्ज व मिड कॅप फंडात, तर २७.१ टक्के ब्ल्यूचिप फंडात गुंतविला. रोखेसंलग्न गुंतवणूकही वेगवेगळ्या मुदतपूर्तीच्या रोखे फंडात गुंतविला होता.

जीईपीएल कॅपिटलचे म्युच्युअल फंड विभागाचे प्रमुख रूपेश भन्साली यांनी, कोणत्या मालमत्ता वर्गात कोणत्या वेळी खरेदी करावी आणि कशातून बाहेर पडावे, याचा निर्णय सामान्यांना  करता येणे अवघड आहे, असे नमूद करून, गुंतवणूकदारांनी अ‍ॅसेट अलोकेशन फंडात आपल्या गुंतवणुकीचा काही हिस्सा राखणे हितावह ठरेल, असे सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2019 4:43 am

Web Title: return on investment plays a major role in the asset division zws 70
Next Stories
1 कॉसमॉस बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीत मुकुंद अभ्यंकर, मिलिंद काळे यांचे पूर्ण पॅनेल विजयी
2 घरांच्या किमती नियंत्रणात; वाढीचा दर अवघा ०.६ टक्के
3 पीएमसी बँक खातेदारांना दिलासा
Just Now!
X