मेमध्ये पाच महिन्याच्या उच्चांकावर पोहोचलेल्या घाऊक किंमत निर्देशांक, इराकमधील स्थितीमुळे इंधन दरात भडक्याची भीती सोमवारी स्थानिक चलनाला डॉलरच्या तुलनेत ६० च्याही तळात घेऊन गेली. ३९ पैशांनी घसरत रुपया ६०.१६ या गेल्या दीड महिन्याच्या नीचांकावर आला.
इराकमधील युद्धसदृश स्थितीमुळे कच्चा तेलाचे दर गेल्या नऊ महिन्याच्या उच्चांकावर पोहोचले आहेत. हे दर आणखी वधारण्याच्या शक्यतेने त्याचा साठा करून ठेवण्याच्या हेतूने तेल आयातदारांकडून अमेरिकी चलनाची मागणी नोंदली जात आहे. सहा प्रमुख जागतिक चलनांमध्ये समावेश असलेल्या डॉलरच्या समोर रुपया सोमवारी व्यवहारात ६० च्या खाली, ६०.२३ पर्यंत घसरला. बंदअखेर चलनाचा स्तर ५ मेच्या ६०.२१ नजीक राहिला. सलग दुसऱ्या सत्रात घसरलेल्या रुपयातील एकूण नुकसान तब्बल ९१ पैशांचे राहिले आहे. दोनच व्यवहारात चलन ५९.२५ वरून थेट ६० च्याही खाली उतरत ६०.१६ पर्यंत घसरले आहे.

दिल्लीत सोने २८ हजारापल्याड;चांदीची ४३ हजारांपुढे मजल
मुंबई : शहरात पांढऱ्या धातूचा भाव सोमवारी किलोमागे ४३ हजार रुपयांपुढे गेला. शनिवारच्या तुलनेत चांदी किलोमागे ५४५ रुपयांनी वधारत ४३,१५० रुपयांवर गेली, तर सोन्याच्या दरातही मोठा चढाव पाहायला मिळाला. स्टॅण्डर्ड सोने तोळ्यासाठी ३२५ रुपयांनी वधारत २७,६५० रुपयांपर्यंत गेले, तर शुद्ध सोन्यातही १० ग्रॅमसाठी याच प्रमाणात वाढ होत ते २७,८०० रुपये झाले. नवी दिल्लीत सलग सहाव्या दिवशी पिवळ्या धातूच्या दरातील चकाकी कायम राहिल्याने सोन्याने तोळ्यासाठी २८ हजार रुपयांचा आकडा पार केला.