भांडवली बाजारातील मोठय़ा पडझडीस रुपयाचा शुक्रवारचा नवा तळ मुख्यत: कारणीभूत ठरला. गुरुवारी डॉलरच्या तुलनेत ६७ च्या खाली गेलेला रुपया सप्ताहअखेरच्या व्यवहारात आणखी घसरत त्याच्या गेल्या २९ महिन्यांच्या तळात विसावला. परकी चलन विनिमय मंचावर स्थानिक चलनाला ३० पैसे कमी प्रतिसाद मिळत रुपया ६७.५९ वर स्थिरावला.

रुपयाने गुरुवारीच ६७ खालील प्रवास नोंदविताना २८ महिन्यांचा नीचांक राखला होता. तर शुक्रवारची त्याची सुरुवातही ६७.३५ या नरमाईने झाली. व्यवहारादरम्यान चलन ६७.७१ पर्यंत खाली आले. आणि दिवसअखेर ते गुरुवारच्या तुलनेत ३० पैशांनी, ०.४५ टक्क्यांनी घसरले. सत्रबंदअखेरचा चलनाचा ६७.५९ हा स्तर यापूर्वीच्या ३ सप्टेंबर २०१३ च्या पातळीनजीक राहिला. या दिवशी रुपया ६७.६३ पर्यंत घसरला होता. तर दुसऱ्याच दिवशी, ४ सप्टेंबर २०१३ मध्ये त्याने ६८.६२ हा व्यवहारातील नीचांक नोंदविला होता.

आतापर्यंत जाहीर झालेल्या कंपन्यांचे तिमाही वित्तीय निष्कर्ष फारसे उत्साहवर्धक नसल्याचे मानून विदेशी गुंतवणूकदारांनी भांडवली बाजाराकडे पाठ फिरविली आहे. परिणामी त्यांच्याकडून वाढलेल्या अमेरिकी चलन – डॉलरच्या मागणीने रुपयाला  कमकुवत बनविले. त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारात घसरत असलेल्या खनिज तेलाच्या चिंतेचीही भर ही देखील डॉलरच्या सशक्तेला मदतकारक ठरली.