भारतीय वंशाच्या मुख्याधिकाऱ्यांची सिलिकॉन व्हॅलीवर सद्दी!
लोकप्रिय शोध संकेतस्थळ गुगलच्या प्रमुखपदी भारतीय वंशाच्या सुंदर पिचई यांच्या नियुक्तीने त्यांना सध्या अनेक जागतिक कंपन्यांची नेतृत्वधुरा सांभाळणाऱ्या भारतीय वंशांच्या तंत्रज्ञाच्या पंक्तीत नेऊन बसविले आहे. गेल्या वर्षीच नोकिया आणि मायक्रोसॉफ्ट या दोन जागतिक कंपन्यांवर अनुक्रमे राजीव सुरी आणि सत्या नाडेला यांची मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. डिजिटल इंडियाकडे वाटचाल करणाऱ्या भारताच्या शिरपेचातील हे मानाचे तुरे व मनोबल उंचावणाऱ्या निश्चितच आहेत.
*  सत्या नाडेला, मायक्रोसॉफ्ट
मणिपाल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीचे पदवीधर असलेले सत्या नाडेला फेब्रुवारी २०१४ मध्ये मायक्रोसॉफ्टचे मुख्याधिकारी बनले. सुमारे २२ वर्षांपासून ते मायक्रोसॉफ्टच्या सेवेत आहेत.
*  राजीव सुरी, नोकिया
एके काळी मोबाइल हँडसेट्सची सर्वात लोकप्रिय नाममुद्रा असलेल्या नोकियाचे बलाढय़ मायक्रोसॉफ्टकडून अधिग्रहण केले गेल्यानंतर राजीव सुरी यांच्याकडे नवरचित नोकियाचे नेतृत्वपद सोपविण्यात आले. मणिपाल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीचे पदवीधर असलेले सुरी यांनी १ मे २०१४ पासून नोकियाचे मुख्याधिकारी म्हणून सूत्रे हाती घेतली.
*  शंतनू नारायण, अ‍ॅडोबे
जानेवारी २००५ मध्ये शंतनू नारायण यांना अ‍ॅडोबे या अभियांत्रिकी तंत्रज्ञान समूहाचे अध्यक्षपद तसेच मुख्य परिचालन अधिकारीपद सोपविण्यात आले. तर डिसेंबर २००७ पासून त्यांच्यावर कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचाही अतिरिक्त भार आला आहे.
* संजय झा, ग्लोबल फाऊंड्रीज
जानेवारी २०१४ मध्ये संजय के झा यांच्याकडे ग्लोबल फाऊंड्रीज या तंत्रज्ञान कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे पद आले. त्या आधी मोटोरोला मोबिलिटीचे मुख्याधिकारी म्हणून त्यांची कारकीर्द राहिली आहे.
* फ्रान्सिस्को डिसूझा, कॉग्निझन्ट
१९९४ मध्ये डन अँड ब्रॅडस्ट्रीट कॉर्पोरेशनची तंत्रज्ञान अंग बनून पुढे आलेल्या कॉग्निझन्टच्या संस्थापकांपैकी एक असलेले फ्रान्सिस्को डिसूझा आज त्या कंपनीचे मुख्याधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
* दिनेश पालिवाल, हरमन इंटरनॅशनल
वाहनांमधील इलेक्ट्रॉनिक्स प्रणाली व ध्वनी उत्पादनांच्या निर्मितीतील हरमन इंटरनॅशनल इंडस्ट्रीजचे अध्यक्ष, मुख्याधिकारी आणि उपाध्यक्ष म्हणून दिनेश पालिवाल जुलै २००७ पासून कामकाज पाहत आहेत.
* अभिजीत तळवळकर, एलएसआय
डेटा सेंटर्ससाठी डिझाइन्ड चिप्स आणि सॉफ्टवेअर प्रणाली विकसित करणाऱ्या एलएसआय कॉर्पोरेशनचे अध्यक्ष व मुख्याधिकारी म्हणून अभी तळवळकर मे २००५ पासून धुरा सांभाळत आहेत.