* नगण्य प्रतिसादामुळे हिस्सा विक्रीला मुदतवाढ; * सात विमानांची नोंदणी रद्दबातल * तेलकंपनीकडून इंधनपुरवठा बंद

मुंबई : कर्जदात्या बँकांचे नेतृत्व करणाऱ्या स्टेट बँकेचे वर्चस्व असलेल्या हवाई सेवा कंपनी जेट एअरवेजसमोरील संकटे संपण्याची चिन्हे नाहीत. कंपनीतील हिस्सा खरेदीसाठी अखेरच्या क्षणापर्यंत कुणीही पुढे न आल्याने या प्रक्रियेला बुधवारी अंतिम दिवशी मुदतवाढ देण्यात आली. तर आठवडय़ात तिसऱ्यांदा ताफ्यातील विमानांसाठी इंधनपुरवठा खंडीत केला गेल्याची नामुष्कीही जेट एअरवेजवर ओढविली आहे.

जेट एअरवेजवर जवळपास निम्मा हिस्सा मिळविणाऱ्या स्टेट बँकेने कंपनीतील हिस्सा विक्रीकरिता गेल्या आठवडय़ात स्वारस्य जाहीर केले होते. यानुसार ८ ते १० एप्रिल दरम्यान ही प्रक्रिया सुरू होती. मात्र त्याला प्रतिसाद न मिळाल्याने १२ एप्रिलपर्यंत मुदत वाढविण्यात आली. ही प्रक्रिया पार पाडणाऱ्या एसबीआय कॅपिटल मार्केट्सच्या मते पात्र बोलीधारकांना शुक्रवापर्यंत रस दाखविता येईल.

जेट एअरवेजच्या विमानांचा इंधन पुरवठा आठवडय़ात तिसऱ्यांदा थांबविण्यात आला आहे. कंपनीने थकीत पैसे न दिल्याने इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने विमानांना बुधवार दुपारपासून इंधन पुरवठा करणे थांबविले. मुंबई, दिल्ली आणि हैदराबाद विमानातळावरील विमानांना इंधन न पुरविण्याचा निर्णय सरकारी तेल कंपनीने घेतला.

कंपनीच्या ताफ्यातील ११९ विमानांची संख्या आता २६ वर आली आहे. कंपनीने वेतन थकविल्याने १६,००० कर्मचारी-वैमानिकांचे नेतृत्व करणाऱ्या संघटनेने जेट एअरवेजच्या व्यवस्थापनालाही नोटीस पाठविली आहे.

अ‍ॅम्स्टरडॅममध्ये विमान जप्त

जेट एअरवेजकडून नियमित देणी फेडली जात नसल्याने तिच्या ताफ्यातील एक मालवाहू विमान बुधवारी अ‍ॅम्स्टरडॅम विमानतळावर जप्त करण्यात आले. युरोपच्या मालवाहतूक कंपनीने जेटचे बोईंग ७७७-३००  जातीचे विमान अ‍ॅम्स्टरडॅमहून मुंबईकरिता बुधवारी निघणार होते.

सात विमानांची नोंदणी रद्दबातल

नवी दिल्ली : विमानोड्डाण क्षेत्राची नियंत्रक ‘डीजीसीए’ने जेट एअरवेजच्या ताफ्यातील सात बोईंग ७३७-८०० जातीच्या विमानांची नोंदणी रद्दबातल करण्याचा बुधवारी निर्णय घेतला. भाडे थकल्याने ही कारवाई केली गेली असून, ती विमाने भाडेपट्टेकार कंपन्यांना ही विमाने ताबडतोब ताब्यात घ्यावीत, असा ‘डीजीसीए’चा आदेश आहे. जेट एअरवेजच्या ताफ्यात ११९ विमाने असून, भाडे थकल्याने गेल्या काही महिन्यांत कंपनीची अनेक विमाने उड्डाणेच घेऊ शकलेली नाहीत. पैकी केवळ २६ विमानांचीच उड्डाणे सध्या कार्यरत होती. त्यात आणखी सात विमानांना आता गळती लागली आहे.