भांडवली बाजाराचे नियंत्रक भारतीय रोखे व नियमन मंडळ अर्थात ‘सेबी’कडून आगामी १० दिवसांच्या आत ‘इनसायडर ट्रेडिंग’च्या प्रवृत्तीला आळा घालणाऱ्या नवीन नियमावलीचा मसुदा सादर केला जाईल. त्याचप्रमाणे स्थावर मालमत्ता क्षेत्रात गुंतवणुकीचा स्रोत खुला करणाऱ्या ‘आरईआयटी’ गुंतवणूक न्यासाचे नियमही डिसेंबरमधील सेबी संचालकांच्या आगामी बैठकीत ठरविले जातील, अशी ग्वाही अध्यक्ष यू. के. सिन्हा यांनी गुरुवारी येथे बोलताना दिली.
‘इनसायडर ट्रेडिंग’बाबत नवीन नियमावलीसाठी ‘सेबी’ने चालू वर्षांत मार्चमध्ये १४ सदस्यीय समितीची स्थापना केली होती. या समितीच्या शिफारशींचा मसुदा तयार झाला असल्याचे सिन्हा यांनी पत्रकारांना सांगितले. संचालक मंडळाकडून त्याला मंजुरी मिळविल्यानंतर हा मसुदा सार्वजनिक केला जाईल व त्यावर लोकांच्या सूचना व हरकती मागविल्या जाणार आहेत. कर्नाटक उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश एन. के. सोधी यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून हा नव्या नियमावलीचा मसुदा तयार झाला आहे.
‘सेबी’पुढे सध्या बाजार अग्रणी रिलायन्स इंडस्ट्रीज लि.मधील काही उच्चाधिकारी अंतस्थांनी पूर्वाश्रमीची रिलायन्स पेट्रोलियम लि.चे विलीनीकरण होत असताना बेकायदेशीररीत्या झालेल्या समभागांच्या उलाढालीतून आर्थिक लाभ कमावला अर्थात इनसायडर ट्रेडिंग नियमांचा भंग केल्याचे प्रकरण प्रलंबित आहे.