मुंबई शेअर बाजाराकडूनही खुलाशाची मागणी

मुंबई : चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाही ताळेबंदाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे कर्मचाऱ्याचे पत्र सादर न केल्याबद्दल सेबी तसेच मुंबई शेअर बाजाराने इन्फोसिसला विचारणा केली आहे. याबाबत त्वरित उत्तर देण्याचे आदेशही संबंधित बाजार यंत्रणांनी दिले आहेत.

कंपनीचा ताळेबंद तसेच संबंधित अधिकाऱ्यांबाबत करण्यात आलेल्या तक्रारीबाबत नेमके तथ्य काय आहे ते त्वरित कळविण्याचे आदेश सेबी व मुंबई शेअर बाजाराने इन्फोसिसला दिले आहेत.

या प्रकरणात सेबीने कारवाई सुरू केल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे. मात्र गुरुवार उशिरापर्यंत भांडवली बाजार नियामक यंत्रणेने परिपत्रक सादर केले नव्हते. मुंबई शेअर बाजाराने मात्र, सेबीच्या नियमाप्रमाणे याबाबत खुलासा करणे आवश्यक असताना इन्फोसिसने तो केला नसल्याचा ठपका ठेवत त्वरित स्पष्टीकरणाचे आदेश गुरुवारीच दिले.

गेल्याच आठवडय़ात जाहीर झालेल्या देशातील आघाडीच्या माहिती तंत्रज्ञान कंपनीच्या ताळेबंदात नफ्याचे आकडे फुगविण्यात आल्याचा आरोप कंपनीच्या कर्मचाऱ्याने नाव उघड न करता संचालक मंडळाला लिहिलेल्या पत्रात केला होता. त्याबद्दल कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी तसेच मुख्य आर्थिक सल्लागारांनाही जबाबदार धरण्यात यावे, असेही पत्रात नमूद करण्यात आले होते.

या पत्रानंतर कंपनीने संबंधित घडामोड कंपनीच्या लेखापरीक्षण समितीसमोर स्पष्ट केल्याचे इन्फोसिसने म्हटले होते. या घटनेनंतर कंपनीच्या विदेशी भागधारकांनी अमेरिकेतून इन्फोसिसविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा देत नुकसानभरपाईची मागणी केली.

कंपनीच्या कर्मचाऱ्याने २० सप्टेंबर रोजी लिहिलेले पत्र प्रत्यक्षात इन्फोसिसला ३० सप्टेंबरला ई-मेल केले. त्यानंतर ३ ऑक्टोबर रोजी ही बाब अमेरिकेच्या भांडवली बाजारालाही कळविण्यात आली. इन्फोसिस नॅसडॅकवर सूचिबद्ध आहे. कंपनीचे अध्यक्ष नंदन निलेकणी यांनी मात्र पत्रात बोट ठेवलेल्या अधिकाऱ्यांनाच तक्रारीची शहानिशा करण्याचे आदेश देत त्यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे.