हिस्सा विक्रीद्वारे अल्पसंख्याक गुंतवणूकदारांचे नुकसान करून आर्थिक घोटाळा के ल्याचा ठपका ठेवत भांडवली बाजार नियामक सेबीने किर्लोस्कर इंडस्ट्रीजच्या प्रवर्तकांवर एका १० वर्षांपूर्वीच्या प्रकरणात कारवाई केली.

किर्लोस्कर इंडस्ट्रीजचे प्रवर्तक अतुल आणि राहुल किर्लोस्कर यांच्यावर एका प्रकरणात किर्लोस्कर इंडस्ट्रीज लिमिटेडला तत्कालीन कंपनी केबीएलचा १३.५ टक्के  हिस्सा विकल्याचा आरोप सेबीने ठेवला आहे. यामुळे कं पनीच्या अल्पसंख्याक गुंतवणूकदारांचे नुकसान करून घोटाळा झाल्याचे सेबीने म्हटले आहे.

केबीएलचे सहा प्रवर्तक आणि इतर दोन जणांवर सेबीने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. किर्लोस्कर इंडस्ट्रीजच्या अल्पसंख्याक भागधारकांची फसवणूक करून शेअर्स विकले जात आहेत. तसेच या प्रवर्तकांना केबीएलच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव असूनही हा घोटाळा करण्यात आला असल्याचे सेबीच्या नोटिशीमध्ये म्हटले आहे.

सेबीने म्हटले आहे की, या व्यवहारात मिळवलेला नफा ३५० कोटी रुपयांपेक्षा अधिक असून यात विक्री व्यवहार, नफ्याच्या मूल्याचा समावेश आहे, असे व्यवहाराबाबत माहिती असणाऱ्याने सांगितले.

६ ऑक्टोबर २०१० रोजी प्रवर्तक गटाने किर्लोस्कर इंडस्ट्रीजला केबीएलचे १.०७ कोटी शेअर्स विकले ज्याची किंमत २७५ कोटी रुपये आहे. सेबीने केबीएलच्या प्रवर्तकांवर आणि इतर दोन जणांवर फसवणूक आणि गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी गौतम कुलकर्णी, राहुल किर्लोस्कर, अतुल किर्लोस्कर, अल्पना किर्लोस्कर, ज्योत्स्ना कुलकर्णी आणि आरती किर्लोस्कर हे थेट विक्रीतील लाभार्थी होते, असा आरोप करण्यात आला.

किर्लोस्कर इंडस्ट्रीजच्या पाचपैकी चार संचालकांना केबीएलच्या ढासळणाऱ्या आर्थिक स्थितीची माहिती होती; असे असूनही हे समभाग खरेदी करण्याचा निर्णय कंपनी आणि त्याच्या भागधारकांच्या हिताचा आहे की नाही याची तपासणी करण्याचे संचालकांचे कर्तव्य होते, असेही सेबीने या नोटिशीमध्ये नमूद केले आहे. यानंतरही या संचालकांनी किर्लोस्कर इंडस्ट्रीजला केबीएलचे शेअर्स खरेदी करण्यास उद्युक्त करून सहा वैयक्तिक प्रवर्तकांनी त्यांचे समभाग घेण्यास परवानगी दिली.

नोटिशीनुसार, सेबीने किर्लोस्कर इंडस्ट्रीजकडून २००९ आणि २०१० मध्ये शेअर्स खरेदी करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी त्याच्या आर्थिक स्थितीविषयी माहिती होती का याबाबतची किर्लोस्कर इंडस्ट्रीजकडून माहिती मागविली होती. किर्लोस्कर इंडस्ट्रीजने उत्तर दिले की, त्यावेळी त्यांनी केबीएलच्या यशाचा आणि नफ्याचा विचार केला.

‘चुकीचे कृत्य नाही; आरोप निराधार’

किर्लोस्कर इंडस्ट्रीजच्या प्रवक्त्याने सांगितले, आम्ही कोणतेही चुकीचे कृत्य केले नसून त्याबाबतच्या कोणत्याही सूचना मिळाल्या नव्हत्या आणि आमच्यावर लावलेल्या आरोपांचेही आम्ही खंडन करतो. २०१० मध्ये झालेली शेअर्सची विक्री कायद्यानुसार असून भांडवली बाजाराच्या नियम व अटी अधिनियमांतंर्गत पूर्व मंजुरीनुसार पूर्ण केली. सेबीच्या सध्या सुरू असलेल्या चौकशीला आम्ही पूर्ण सहकार्य करू आणि या आरोपातून आम्ही निश्चितच बाहेर पडू असा आमचा विश्वास आहे.