मुंबई : हिरे व्यापारी निरव मोदी फसवणूक प्रकरण घडल्यानंतर त्याबाबतची माहिती देण्यास पंजाब नॅशनल बँकेला आठवडय़ाचा विलंब लागल्याचा ठपका भांडवली बाजार नियामक सेबीने ठेवला आहे.

जानेवारी २०१८ च्या अखेरीस निरव मोदीने पीएनबीला फसविल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. याबाबत बँकेने केंद्रीय अन्वेषण विभागाकडे तक्रारही केली. मात्र बँकेने याबाबतची माहिती देण्यास सहा दिवसांहून अधिक कालावधी लावला, असे सेबीने म्हटले आहे.

या प्रकरणाची माहिती त्वरित न देता बँकेने याबाबतच्या शिस्तीचे उल्लंघन केले असून यापुढे सावध राहावे, असा इशाराही सेबीने दिला आहे. याबाबत बँकेला पाठविलेले पत्र पीएनबीने गुरुवारी मुंबई शेअर बाजाराला पाठविले.

दरम्यान देशातील दुसऱ्या क्रमांकाची राष्ट्रीयीकृत बँक पंजाब नॅशनल बँकेला १४,००० कोटी रुपयांनी फसविल्या प्रकरणात तपास यंत्रणांनी बुधवारी मुंबईच्या केंद्रीय अन्वेषण विभागाच्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. काळा पैसा प्रतिबंधक कायद्यांतर्गत फसवणूक तसेच गुन्हेगारीच्या विविध कलमांतर्गत मेहूल चोक्सी, गीतांजली समूह तसेच मोदी-चोक्सीशी संबंधित कंपन्यांविरुद्ध आरोपपत्रात विविध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

मेहूल चोक्सीचा मामा निरव मोदीविरुद्ध १४ मे रोजी दाखल केलेल्या आरोपपत्राव्यतिरिक्त हे नवीन आरोपपत्र असल्याचे केंद्रीय अन्वेषण विभागाने स्पष्ट केले आहे. मोदी प्रकरणात पुरवणी आरोपपत्र लवकरच दाखल करण्यात येईल.