करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या परिणामी ‘नोमुरा’कडून विकासदर अंदाजात कपात
मुंबई : करोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी अधिकाधिक राज्यांमध्ये टाळेबंदीसारखे कठोर निर्बंध, संचारबंदीसारखे उपाय आणि त्याची परिणती म्हणजे कैक महिन्यांनंतर रुळावर येऊ पाहत असलेल्या अर्थचक्राला गती पकडण्याआधीच पुन्हा ब्रेक लागण्यात होत असल्याचे दिसून येते, असे निरीक्षण जपानची दलाली पेढी नोमुराने मंगळवारी नोंदविले.
करोनाच्या दुसऱ्या लाटेने भारतातील आर्थिक-व्यावसायिक क्रियाकलाप कमालीचे थंडावले असून, ते गत वर्षातील जूनच्या पातळीवर घसरले आहेत. नोमुराच्या ‘इंडिया बिझनेस रिझम्पशन इंडिया’ या निर्देशांकानुसार आर्थिक-व्यावसायिक क्रियांची पातळी ही ९ मेअखेर संपलेल्या सप्ताहात ६९.७ अंशांवरून, ६४.५ अंशावर गडगडली आहे. म्हणजे फेब्रुवारी २०२१ मध्ये दिसून आलेल्या पुनर्उभारीच्या तुलनेत हा निर्देशांक तब्बल ३५.५ टक्के गडगडला असल्याचे ही आकडेवारी दर्शविते.
या पार्श्वभूमीवर जपानी दलाली पेढीने आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाचा अंदाज आधी व्यक्त केलेल्या १२.६ टक्क्यांवरून आता १०.८ टक्के असा खालावत आणला आहे. चालू तिमाहीतील ठिकठिकाणच्या टाळेबंदीच्या एकत्रित परिणामांच्या अनुषंगाने ही कपात असल्याचे नोमुराने स्पष्ट केले आहे.
राज्यव्यापी टाळेबंदीसदृश कडक उपायांमुळे लोकांच्या संचारावरील निर्बंध हे आर्थिक क्रियाशीलतेत घसरणीलाही कारणीभूत ठरले आहे. गुगलच्या कार्यक्षेत्र आणि गतिशीलता निर्देशांकातील चालू महिन्यातील १० टक्क्यांची घसरण याचाच प्रत्यय देणारी आहे. सरलेल्या आठवड्यातील विजेच्या मागणीतील ४.१ टक्क्यांची घसरण याची पुष्टी करणारी असल्याचे नोमुराने टिपणात म्हटले आहे.