नफेखोरीने निर्देशांकात माफक घसरण

अभूतपूर्व ४१,१२०.२८ पर्यंत झेप आणि या विक्रमी स्तरावर पोहोचल्यानंतर भांडवली बाजारात गुंतवणूकदारांनी केलेल्या नफेखोरीने ‘सेन्सेक्स’ माघारी आला. मंगळवारी बाजारातील झालेल्या व्यवहाराच्या या वैशिष्टय़ात, मुख्यत: दूरसंचार, माहिती तंत्रज्ञान, वाहन क्षेत्रातील समभागांच्याने निर्देशांकांमध्ये माफक प्रमाणात घसरण दिसून आली.

सोमवारी ४१ हजाराच्या उंबरठय़ावर बंद झालेला मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्सने मंगळवारच्या व्यवहारात ४१,१२०.२८ पर्यंत झेप घेतली होती. आठवडय़ाच्या पहिल्याच सत्रात ५०० हून अधिक अंशांची झेप घेणाऱ्या मुंबई निर्देशांकात मंगळवारी ६७.९३ अंशांनी घसरला.  सेन्सेक्स  दिवसअखेरीस ४०,८२१.३० पातळीवर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने सत्रात १२ हजारांवर स्पर्श केला. दिवसअखेर तो सोमवारच्या तुलनेत ३६.०५ अंश घसरणीने १२,०३७.७० वर स्थिरावला.

सेन्सेक्समध्ये भारती एअरटेल सर्वाधिक ४.३४ टक्क्यांनी घसरला. त्याचबरोबर टीसीएस, इन्फोसिस, एचसीएल टेक, मारुती, महिंद्र अँड महिंद्र, टाटा मोटर्स, पॉवरग्रिड, सन फार्मा आदींचेही मूल्य घसरले.

मुंबई निर्देशांकातील आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक, टाटा स्टील, आयटीसी आदी मात्र २.२६ टक्क्यांनी वाढले. तर क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये दूरसंचार, माहिती तंत्रज्ञान, भांडवली वस्तू, वाहन, स्थावर मालमत्ता, ऊर्जा निर्देशांक जवळपास दोन टक्क्यांनी घसरले.

याउलट बँक, वित्त क्षेत्रीय निर्देशांक काही प्रमाणात उंचावले. मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप निर्देशांक ०.७९ टक्क्यांनी घसरले.