वरच्या टप्प्याला पोहोचलेले समभाग मूल्यातून गुंतवणूकदारांनी नफा गाठीला बांधून घेण्याचे धोरण आठवडय़ाच्या दुसऱ्या दिवशी अनुसरले. यामुळे १४५.२५ अंश घसरणीसह सेन्सेक्स मंगळवारी २५,५९०.६५ वर येऊन ठेपला. तर ४८.३५ अंश घसरणीने निफ्टी ५० निर्देशांक ७,८०० चा स्तर सोडून ७,७८६.१० वर विसावला. मंगळवारी सायंकाळी जाहीर होणाऱ्या सप्टेंबरमधील चालू खात्यावरील तुटीच्या आकडय़ापूर्वी बाजारात नफेखोरीची संधी साधली गेली.
बँकांच्या वाढत्या अनुत्पादक मालमत्तांची चिंता काहीशी दूर सारू शकणाऱ्या दिवाळखोरीसंबंधी संहिता संसदेत मंजूर झाल्याने नव्या सप्ताहाची सुरुवात बाजाराने सोमवारी तेजीसह केली होती. यातून सेन्सेक्समध्ये द्विशतकी भर पडली. तर निफ्टीने ७,८०० चा स्तर पार केला होता.
मंगळवारी मात्र बाजारात माहिती तंत्रज्ञान, पोलाद तसेच वाहन उत्पादन क्षेत्रातील समभागांची विक्री झाली. अमेरिकेच्या व्हिसा शुल्क दरवाढीची छाया माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील इन्फोसिस, टीसीएस, विप्रो यांच्यांवर राहिली व एकूण या क्षेत्रातील निर्देशांकही १.१५ टक्क्याने घसरला.
तसेच महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र, अदानी पोर्ट, ल्युपिन, स्टेट बँक, हीरो मोटोकॉर्प, एल अ‍ॅण्ड टी, टाटा मोटर्स हे घसरणीत राहिले. सेन्सेक्समधील २० समभागांचे मूल्य घसरले. तर १० समभागांना मागणी राहिली.
यामध्ये सन फार्मा, अ‍ॅक्सिस बँक, एअरटेल, एशियन पेन्ट्स, गेल यांचे समभाग मूल्य वाढले. एअरसेलसह भागीदारीच्या चर्चेने रिलायन्स कम्युनिकेशन्स २.३९ टक्के वाढला.