19 October 2018

News Flash

सेन्सेक्स-निफ्टीकडून नवीन शिखर सर!

शुक्रवारच्या व्यवहारात १८४.२१ अंश वाढीसह सेन्सेक्स ३४,१५३.८५ पर्यंत झेपावला.

प्रतिनिधिक छायाचित्र

नववर्षांतील पहिली सप्ताह वाढ

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना मिळत असलेल्या सरकारी अर्थसाहाय्याचे स्वागत भांडवली बाजारात सलग दुसऱ्या दिवशीही राहिले. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीच्या वातावरणाने सेन्सेक्स तसेच निफ्टीला सप्ताहअखेर नव्या उच्चांकी टप्प्यावर नेऊन ठेवले.

शुक्रवारच्या व्यवहारात १८४.२१ अंश वाढीसह सेन्सेक्स ३४,१५३.८५ पर्यंत झेपावला. तर ५४.०५ अंश वाढीमुळे निफ्टी १०,५५८.८५ वर स्थिरावला. गेल्या आठवडय़ातील विक्रमी टप्पे मागे टाकण्यासह भांडवली बाजाराच्या प्रमुख निर्देशांकाचे २०१८ मधील पहिल्या सप्ताहाचे व्यवहार सकारात्मक वाढीसह संपुष्टात आले.

वाढत्या बुडीत कर्जाचा सामना करणाऱ्या देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकरिता सरकारने अतिरिक्त ८०,००० कोटी रुपयांच्या खर्चाला गुरुवारी संसदेत मंजुरी मिळविली. परिणामी, सलग दुसऱ्या व्यवहारात बँक क्षेत्रातील समभागांसह प्रमुख निर्देशांकांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले.

मुंबईसह राष्ट्रीय शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकाने २९ डिसेंबर रोजी सर्वोच्च टप्पा गाठला होता. शुक्रवारी बंदअखेर तोही मागे टाकताना व्यवहारात सेन्सेक्स ३४ हजाराच्या पुढे जातानाच ३४,१८८.८५ पर्यंत उंचावला. तर निफ्टीची शुक्रवारची मजल १०,५०० पुढे कायम राखताना १०,५६६.१० वर गेली.

साप्ताहिक तुलेनेत सेन्सेक्स, निफ्टीची शुक्रवारअखेर सलग पाचवी वाढ होती. आठवडादरम्यान सेन्सेक्स ९७.०२ अंश, तर निफ्टी २८.१५ अंशांनी वाढला आहे.

सेन्सेक्समध्ये येस बँक सर्वाधिक, ५.०३ टक्के वाढीसह आघाडीवर राहिला. त्याचबरोबर अदानी पोर्ट्स, भारती एअरटेल, इंडसइंड बँक, डॉ. रेड्डीज्, एचडीएफसी लिमिटेड, एशियन पेंट्स, टीसीएस, टाटा स्टील, आयटीसी लिमिटेड, अ‍ॅक्सिस बँक, मारुती सुझुकी, बजाज ऑटो, एचडीएफसी बँक, कोल इंडिया, रिलायन्स इंडस्ट्रीज, कोटक महिंद्र बँक, टाटा मोटर्स, पॉवरग्रिड, हिंदुस्थान यूनिलिव्हर, एनटीपीसी, महिंद्र अँड महिंद्र आदी ३.३६ टक्क्यांसह वाढले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये दूरसंचार २.७५ टक्क्यांसह अग्रेसर राहिला. ग्राहकोपयोगी वस्तू, माहिती तंत्रज्ञान, स्थावर मालमत्ता, वाहन, आरोग्यनिगा, बँक, पोलाद आदींमधील वाढ १.२५ टक्क्यांपर्यंत राहिली.

आंतरराष्ट्रीय बाजारात वाढत असलेल्या खनिज तेल दरामुळे एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसी आदी सार्वजनिक क्षेत्रातील तेल व वायू विक्री व विपणन कंपन्यांचे मूल्य रोडावले. मुंबई शेअर बाजारातील स्मॉल कॅप व मिड कॅप निर्देशांक अनुक्रमे ०.९७ व ०.६९ टक्क्यांपर्यंत वाढले.

‘डाऊ’ इतिहासात प्रथमच २५ हजारापल्याड

अमेरिकेच्या डाऊ जोन्स निर्देशांकाने इतिहासात प्रथमच २५,००० चा टप्पा गाठल्याच्या स्वागतलहरींवर शुक्रवारी आशियातील प्रमुख भांडवली बाजारही स्वार होते. बहुतांश आशियाई बाजारात २००७ सालच्या तेजीत गाठले गेलेल्या उच्चांकी शिखरांना गवसणी घातली. जपानच्या निक्केई निर्देशांकांने तर २६ वर्षे मागे टाकलेल्या उच्चांकापुढे मजल मारली. चीनचा शांघाय कंपोझिट, हाँग काँगचा हँग सेंग आदी एक टक्क्यापर्यंत वाढले होते. तसेच युरोपीय बाजारांची सुरुवातही तेजीसह झाली होती.

First Published on January 6, 2018 3:41 am

Web Title: sensex closes at 184 points higher