करोनाबाधेच्या वाढत्या छायेने अर्थव्यवस्थेच्या फेरउभारीसंबंधाने जगभरातील प्रमुख भांडवली बाजारातील चिंतायुक्त घसरणीचे पडसाद स्थानिक बाजारातही गुरुवारी उमटले. जगभरातील बाजारातील निर्देशांकांच्या पडझडीचे अनुकरण करीत ‘सेन्सेक्स’ १,११५ अंशांनी गडगडला.

उल्लेखनीय म्हणजे सध्याच्या अस्थिर परिस्थितीत सोन्यातील गुंतवणुकीचा आश्रय घेणाऱ्या गुंतवणूकदारांचाही गुरुवारी हिरमोड झाला. सलग चौथ्या दिवसातील घसरणीत सोने १८०० रुपयांनी स्वस्त होऊन, गुरुवारी ५० हजारांखाली विसावले.

देशांतर्गत डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यात तीव्र स्वरूपाची घसरण आणि सप्टेंबर महिन्यातील बाजारातील वायदा सौद्यांची पूर्तता यांचा एकत्रित परिणाम निर्देशांकांतील मोठय़ा उतारात दिसून आला. सलग सहाव्या सत्रात पडझड सुरू राहून, गुरुवारी सेन्सेक्स १,११४.८२ अंशाच्या ऱ्हासासह ३६,५५३.६० ही पातळी गाठली. व्यापक प्रतिनिधित्व असलेला निफ्टी निर्देशांकही ३२६.३० अंश गमावून १०,८०५.५५ या महत्त्वाच्या आधार पातळीच्या वेशीवर दिवसाचे व्यवहार थंडावले तेव्हा विसावलेला दिसून आला. भांडवली बाजारातील या पडझडीत गुंतवणूकदारांना तब्बल चार लाख कोटींचा फटका बसला. सर्वाधिक नुकसान हे विक्रीचा मोठा दणका बसलेल्या माहिती-तंत्रज्ञान समभागांनी केले.

सोने-चांदीवर झाकोळ

* सोने-चांदी या मौल्यवान धातूंच्या किमतीत सलग चार दिवस घसरण सुरू राहून, त्या आता महिनाभरापूर्वी म्हणजे ऑगस्टच्या मध्याला मागे सोडलेल्या स्तरावर पोहोचल्या आहेत.

* गुरुवारी सराफ बाजारात २४ कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत महिनाभरानंतर प्रथमच ५० हजारांखाली ४९,८२२ रुपयांवर विसावली.

* सोमवारी, २१ सप्टेंबरला हीच किंमत ५१,६१२ अशी होती. म्हणजे चार दिवसांत सोने १,८०० रुपयांनी खाली आले आहे.

* गुरुवारच्या व्यवहारात चांदीच्या किमतीत किलोमागे २,४३५ रुपयांचा तीव्र स्वरूपाचा उतार दिसून आला. सोमवारपासून चांदीनेही ८,५४० रुपयांचे मोल गमावले आहे.