निफ्टीने अर्धशतकी वाढीसह ११,९००ची पातळी

bतेजी-मंदीच्या दोलायमान व्यवहाराची अखेर करीत बुधवारी प्रमुख निर्देशांकांनी पुन्हा मुसंडी घेतली. इंधनाचे दर कमी होण्याच्या आशेने गुंतवणूकदारांकडून तेल व वायू तसेच वाहन क्षेत्रातील समभागांना मागणी मिळाल्याने सेन्सेक्स व निफ्टी मंगळवारच्या तुलनेत जवळपास अर्ध्या टक्क्याने वाढले.

बुधवारी आठवडय़ाच्या तिसऱ्या सत्रात ३३० अंशांची झेप घेत, मुंबई निर्देशांक १७२.६९ अंश वाढीसह ४०,४१२.५७ पर्यंत पोहोचला. तर ५३.३५ अंश वाढीने निफ्टी ११,९१०.१५ वर स्थिरावला. दोन्ही प्रमुख निर्देशांक आता त्यांच्या विक्रमी टप्प्यानजीक पोहोचले आहेत.

मुंबई निर्देशांकातील एनटीपीसी, ओएनजीसी, टेक महिंद्र, कोटक महिंद्र बँक, टीसीएस, एशियन पेंट्स, इंडसइंड बँक, टाटा मोटर्स जवळपास ३ टक्क्यांपर्यंत वाढले. येस बँक, वेदांता, हीरो मोटोकॉर्प, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो, भारती एअरटेल, हिंदुस्थान यूनिलिव्हर मात्र १.६३ टक्क्यांपर्यंत घसरले.

आशियाई विकास बँकेने भारताच्या विकास दराबाबतचा चालू वित्त वर्षांचा अंदाज कमी अधोरेखित केल्याने भांडवली बाजारात विक्री दबाव निर्माण झाल्याने दिवसअखेर निर्देशांकातील तेजी मोठी राहू शकली नाही. ग्रामीण भागातील वस्तू व सेवेकरिता असलेली कमी मागणी आणि संथ रोजगारवाढ याबाबतच्या बुधवारी व्यक्त करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय बँकेच्या अहवाल चिंतेचेही पडसाद काही प्रमाणात भांडवली बाजारात पडले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये बहुपयोगी निर्देशांक सर्वाधिक, १.५२ टक्क्यांसह वाढला. त्याचबरोबर तेल व वायू, ऊर्जा, माहिती तंत्रज्ञान, स्थावर मालमत्ता, वित्त आदीही वाढले. तर भांडवली वस्तू, दूरसंचार, ग्राहकोपयोगी वस्तू, पोलाद आदी मात्र जवळपास एक टक्क्यापर्यंत घसरले.