भांडवली बाजार निर्देशांकांनी गुरुवारी सलग चौथ्या सत्रात वाढीचा क्रम कायम ठेवला. अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हच्या नरमाईच्या धोरणाचा पुनरुच्चार व जागतिक बाजाराच्या सकारात्मकतेच्या परिणामी, सत्रारंभी ५०,००० पुढे उसळलेल्या ‘सेन्सेक्स’ला दिवसाचे व्यवहार सरेपर्यंत ही पातळी मात्र राखून ठेवता आली नाही.

अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या विनिमय मूल्यातील मजबुतीने स्थानिक बाजारातील खरेदीच्या उत्साहात भर घातली. मात्र गुरुवारी व्यवहार सुरू होताच ५०,०००च्या पुढचा टप्पा गाठणाऱ्या सेन्सेक्सला नंतरच्या व्यवहारात या कमाईला सांभाळून ठेवता आले नाही. दिवसाचे व्यवहार थंडावले तेव्हा सेन्सेक्स अवघ्या ३२.१० अंशांची वाढ साधून ४९,७६५.९४ वर स्थिरावला. बरोबरीने निफ्टी ने ३०.३५ अंश कमावून १४,८९४.९० वर दिवसाला निरोप दिला.

अर्थ-प्रोत्साहनपर योजलेल्या उपाययोजना इतक्यात माघारी घेतल्या जाणार नाहीत आणि व्याजाचे दर शून्यानजीक तसेच रोखे-खरेदीचा कार्यक्रमही अव्याहत सुरू राहील, या फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरॉम पॉवेल यांच्या वक्तव्याने जागतिक स्तरावर भांडवली बाजारांत गुंतवणूकदारांना चांगलेच स्फुरण मिळवून दिले.