विदेशी गुंतवणुकीचा निरंतर ओघ, कंपन्यांचे उत्साहवर्धक तिमाही निकाल, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत वधारलेला रुपया हे घटक भांडवली बाजारातील खरेदी-उत्साहाला चालना देणारे ठरले, परिणामी ‘सेन्सेक्स’ने सलग चौथ्या सत्रात वाढीचा क्रम कायम ठेवत, मंगळवारच्या व्यवहारात त्यात २२५ अंशांची आणखी भर घातली.

जागतिक स्तरावर भांडवली बाजारातील सकारात्मकतेचा स्थानिक बाजारात निर्देशांकांत प्रतिबिंब उमटताना दिसले. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने सोमवारच्या तुलनेत ३७५ अंशांच्या मुसंडीसह ३८,५५६.२७ उच्चांक स्थापित केल्यानंतर, व्यवहार सत्राची अखेर २२४.९३ अंशांच्या कमाईसह ३८,४०७.०१ पातळीवर केला. त्याचप्रमाणे निफ्टी निर्देशांक ५२.३५ अंशांची भर घालत मंगळवारच्या व्यवहाराअंती ११,३२२.५० वर विसावला.

अ‍ॅक्सिस बँकेचे सेन्सेक्सच्या वाढीत सर्वाधिक योगदान राहिले, तर एचडीएफसी बँक, एचडीएफसी लि., रिलायन्स इंडस्ट्रीज, आयटीसी, इंडसइंड बँक, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक या मातब्बर समभागांचे निर्देशांकांच्या वाढीला मोठा हातभार लावला. त्या उलट टायटन, भारती एअरटेल, एचसीएल टेक आणि ओएनजीसी हे निर्देशांकात सामील असलेले घसरण नोंदविणारे समभाग ठरले.

अर्थप्रोत्साहनार्थ पॅकेजबाबत अमेरिकेत एकमत झाल्याने जगातील प्रमुख भांडवली बाजारात दिसून आलेल्या चैतन्याचे प्रतिबिंब आशियाई व स्थानिक बाजारात पडलेले दिसून आले. करोना लसीच्या यशस्वी चाचणीसह नोंदणी करणाऱ्या देशाचा मान मिळविलेल्या रशियातील घडामोडीचीही बाजाराने सकारात्मक नोंद घेतली.