चांगल्या मान्सूनच्या आशेने निर्देशांक अनोख्या टप्प्यावर

गेल्या दोन व्यवहारातील घसरण मोडून काढताना भांडवली बाजाराने नव्या सप्ताहाची सुरुवात मोठय़ा निर्देशांक वाढीने केली.

यंदा मान्सून चांगला होण्याच्या सरकारच्या अंदाजाने तसेच रिझव्‍‌र्ह बँकेने व्यापारी बँकांना दिलेल्या प्राधान्य वित्त पुरवठा वाढविण्याच्या प्रोत्साहनामुळे निफ्टीला ७,६०० तर सेन्सेक्सला २५,००० पुढील पल्ला सहज पार करता आला.

इन्फोसिसच्या रुपाने कंपन्यांच्या तिमाही निकालाच्या यंदाच्या हंगामाने सुरूवात होण्यापूर्वीच एकूण माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांसह बँक क्षेत्रातील समभागांनी सोमवारी लक्षणीय कामगिरी बजावली.

३८४.३२ अंश वाढीने मुंबई निर्देशांक २५,०२२.१६ पर्यंत तर ११६.२० अंश भर पडल्याने निफ्टी ७,६७१.४० वर झेपावला.

२४,७८९.४० या वाढत्या स्तरावरच नव्या आठवडय़ाची सुरुवात करणारा मुंबई निर्देशांक सत्रात २५,०४९.९२ पर्यंत उंचावला. तर त्याचा किमान स्तर हा २४,५२३.२० राहिला. गेल्या सलग दोन व्यवहारात सेन्सेक्स २२६.७९ अंशांनी घसरला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने सोमवारचा प्रवास ७,५१६.८५ ते ७,६७८.८० असा वरचा नोंदविला.

रिझव्‍‌र्ह बँकेने गेल्या आठवडाअखेर अन्य व्यापारी बँकांना सढळ हाताने वित्त पुरवठा करण्याचे आदेश दिले होते. विविध प्राधान्य क्षेत्राला कर्ज देण्याबाबतचे आवाहन करून चालू आर्थिक वर्षांची सुरुवात चांगली राहण्याचे संकेतच याद्वारे दिले गेले. तसेच गेल्या सलग दोन कोरडय़ा दुष्काळानंतर यंदा पुरेसा पाऊस पडण्याबाबत देशाच्या कृषी सचिवांनी आश्वास्त केल्यानेही बाजारात चैतन्य पसरले.

मुंबई शेअर बाजारातील बँक निर्देशांक १.६७ टक्क्य़ांसह वाढला. तर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील इन्फोसिस, विप्रो, टीसीएस यांचे समभाग मूल्य ३ टक्क्य़ांपर्यंत वाढले.

एअरसेलच्या ४जी ध्वनिलहरी परवाने प्राप्तीनंतर भारती एअरटेलच्या समभागाला व्यवहारअखेर ४.२० टक्के अधिक भाव मिळाला. मोबाईल ग्राहकसंख्येबाबत देशातील सर्वात मोठय़ा दूरसंचार भारती एअरटेलने एअरसेलचे आठ परिमंडळातील परवाने ३,५०० कोटी रुपयांना खरेदी करण्याचे निश्चित केले आहे. तर गेल्या पाच वर्षांतील सर्वोत्तम अशी ४३,७२७ कोटी रुपयांची मागणी नोंदविणाऱ्या सार्वजनिक भेल कंपनीच्या समभागाने सलग तिसऱ्या सत्रात तेजी नोंदविताना सोमवारी ४ टक्के वाढीची कामगिरी बजाविली.

सेन्सेक्समधील केवळ चार समभागांचेच मूल्य घसरले. त्यात तीन कंपन्या या तर औषधनिर्मिती क्षेत्रातीलच होत्या. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये दूरसंचार ३.८९ टक्क्य़ांनी वाढला होता. मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप निर्देशांक अर्धा ते एक टक्क्य़ापर्यंत उंचावले होते.

एस अ‍ॅन्ड पी बीएसई आयटी निर्देशांक :

११,२७६.४८ (+१.९२%)

टीसीएस

रु. २,५०६.६५ (३.२१%)

इन्फोसिस

रु. १,१८४.४० (+१.४६%)

विप्रो

रु. ५६५.२५ (+३.३६%)