भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांकाच्या विक्रमाची आगेकूच सलग पाचव्या दिवशीही कायम राहिली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आता २२,३३९.९७ वर पोहोचला आहे. सप्ताहअखेर त्यात गुरुवारच्या तुलनेत सव्वाशे अंशांची भर पडली. निफ्टीतही ५४.१५ अंशवाढ नोंदली गेली. यामुळे राष्ट्रीय शेअर बाजाराचा हा निर्देशांकदेखील ६,६९५.९० या नव्या सर्वोच्च पदावर विराजमान झाला.
सप्ताहाची अखेरीस सेन्सेक्स व निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी व्यवहारांत अनुक्रमे २२,३६३.९७ आणि ६,७०२.६० असे यापूर्वी केव्हाही न पाहिलेले उच्चांक दाखविले. बंद होताना या पातळीपेक्षा दोन्ही निर्देशांक खाली विसावले असले तरी सर्वोच्च शिखराचा त्यांचा विक्रम मात्र कायम राहिला. रिझव्‍‌र्ह बँकेने ‘बॅसल३’ची मुदत वाढविण्याचा परिणामही बाजारात नोंदला गेला.
गेल्या आठवडय़ाभरापासून बाजारातील विदेशी संस्थांचा ओघ वाढता राहिला आहे. त्यातच शुक्रवारी डॉलरच्या तुलनेत ६० पर्यंत वधारलेल्या रुपयाचाही परिणाम दिसून आला. अर्थव्यवस्था स्थिरावण्यासह रिझव्‍‌र्ह बँकेच्या सोमवारच्या संभाव्य स्थिर पतधोरणाच्या कयासावरही सकारात्मक प्रतिसाद बाजाराने नोंदविला. मध्यंतरातील नरमाई सोडल्यास दोन्ही निर्देशांकांची अखेर नव्या तेजीसह झाली.
विदेशी वित्तसंस्थांनी सलग १२ व्या दिवशीही बाजारात मागणीतील जोर राखला. १२ मार्चपासून त्यांनी भांडवली बाजारात १८,०७३ कोटी रुपये गुंतविले आहेत. साप्ताहिक स्तरावरही गेल्या तीन सप्ताहांतील सर्वात उत्तुंग कामगिरी सेन्सेक्सने यंदाच्या आठवडय़ात दाखविली. पाचही दिवस नवे शिखर नोंदविणाऱ्या सेन्सेक्सची ५८४.६५ अंश अशी आठवडय़ाची कमाई आहे.
सेन्सेक्समधील १९ समभागांचे मूल्य वधारले. ऊर्जा, पोलाद, बांधकाम, बँक यांची सरशीत आघाडी होती. यात टाटा पॉवर सर्वाधिक ४.५४ टक्क्यांसह आघाडीवर होता. विक्रमाकडे आठवडाभर मागे वळून न पाहणाऱ्या भांडवली बाजाराच्या सोमवारच्या प्रवासाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. मंगळवार १ एप्रिल रोजी रिझव्‍‌र्ह बँकेचे पतधोरणही आहे.
रुपयाचा पुन्हा ‘साठी’ला फेर!
तब्बल ८ महिन्यांनंतर रुपयाने डॉलरमागे ६० च्या पातळीवर फेर धरला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया शुक्रवारी पुन्हा ४० पैशांनी भक्कम बनत ५९.९१ पर्यंत उंचावला आहे. भारतीय चलनाने चालू महिन्यात तब्बल २.८ टक्क्यांची वाढ नोंदविली आहे. रुपया यापूर्वी ३० जुलै रोजी ५९.५२ या किमान पातळीवर होता.
सोन्यालाही आकर्षक भाव!
भांडवली आणि परकी चलन बाजारात विलक्षण तेजी नोंदली जात असतानाच सराफा बाजारात मौल्यवान धातूंमध्ये मोठी नरमाई पाहायला मिळत आहे. मुंबईत स्टॅण्डर्ड सोन्याचा तोळ्याचा दर २५५ रुपयांनी कमी होत थेट २८,२०० रुपयांवर येऊन ठेपला आहे, तर चांदीच्या दरातील किलोमागील दरात ३५० रुपयांपर्यंत घसरण होत ते ४२,२५० रुपयांवर आले आहे.