News Flash

नफेखोरीने सेन्सेक्सची घसरण

भांडवली बाजारातील गेल्या सलग पाच व्यवहारातील तेजीला मंगळवारी नफेखोरीने अटकाव

मासिक स्तरावर मात्र निर्देशांकांची सलग तिसरी वाढीची कामगिरी

भांडवली बाजारातील गेल्या सलग पाच व्यवहारातील तेजीला मंगळवारी नफेखोरीने अटकाव बसला. ५७.६४ अंश घसरणीमुळे सेन्सेक्स २६,६६७.९६ वर येताना त्याच्या गेल्या सात महिन्यांच्या वरच्या टप्प्यापासूनही ढळला. १८.४० अंश नुकसानासह राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८,२०० पासून आणखी लांब जात ८,१६०.१० पर्यंत येऊन ठेपला.
बाजाराने महिन्याची अखेर घसरणीने नोंदविली असली तरी सलग तिसरी मासिक वाढ मात्र बाजाराने राखली आहे. संपूर्ण मे महिन्यात सेन्सेक्स (+१,०६१.३४) व निफ्टी (+३१०.३०) प्रत्येकी जवळपास ४ टक्क्य़ांनी वाढले आहेत.
गेल्या आठवडय़ात निफ्टीने ८,२०० चा अनोखा टप्पा सर केला, तर सेन्सेक्स २६,७०० नजीक राहताना गेल्या सात महिन्यांच्या उच्चांकावर राहिला होता. यंदा पाऊस चांगला राहण्याच्या तसेच कंपन्यांच्या नफ्यातील वित्तीय निष्कर्षांवर गेल्या सलग पाच व्यवहारात सेन्सेक्सने १,४९५ अंश (+५.९२%) भर नोंदविली आहे.
वरच्या टप्प्यावर गुंतवणूकदारांच्या नफेखोरीसह आशिया व युरोपातील बाजाराच्या नरमाईचा सूर उमटला. मुंबई तसेच राष्ट्रीय अशा दोन्ही बाजारातील सुरुवातीची तेजी दिवसअखेर संपुष्टात आली. अमेरिकी फेडरल तसेच भारतीय रिझव्‍‌र्ह बँक यांच्यामार्फत येत्या कालावधीत व्याजदर कपातीची शक्यता नसल्याचे गुंतवणूकदारांनी हेरल्यानेही बाजारावर दबाव निर्माण झाला.
तिमाही वित्तीय निष्कर्षांबाबत बाजाराच्या अपेक्षेस न उतरलेल्या सन फार्माचा समभाग सेन्सेक्समध्ये घसरणीत सर्वात वर राहिला. तसेच गेल, टीसीएस, आयटीसी, भारती एअरटेल, ओएनजीसी, इन्फोसिस, रिलायन्स, एल अ‍ॅन्ड टी, विप्रो, महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र आदी मुंबई निर्देशांकातील निम्मे समभाग वाढले. तर त्याच प्रमाणात वधारलेल्या समभागांमध्ये टाटा मोटर्स, टाटा स्टील, स्टेट बँक, मारुती सुझुकी, एचडीएफसी, अदानी पोर्ट्स, ल्युपिन, अ‍ॅक्सिस बँक, बजाज ऑटो आदी तेजीच्या यादीत राहिले. आरोग्यनिगा, माहिती तंत्रज्ञान, तेल व वायू, ऊर्जा, भांडवली वस्तू आदी निर्देशांक घसरले. मिड व स्मॉल कॅप निर्देशांकांत अनुक्रमे -०.१८ व ०.१४ टक्के घसरण नोंदली गेली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2016 7:50 am

Web Title: sensex nifty snap 5 day rally on profit booking banks auto up
Next Stories
1 पावसाळी अधिवेशनात ‘जीएसटी’ला मंजुरीचा विश्वास; आर्थिक सुधारणांना गती देण्याची अर्थमंत्र्यांची ग्वाही!
2 सरकारच्या कर-माघारीने सराफ पेढय़ांच्या समभागांना झळाळी
3 घसरत्या व्याजदर काळात आदर्श गुंतवणूक पर्याय
Just Now!
X