अनोख्या टप्प्याला पोहोचलेल्या भांडवली बाजारातील निर्देशांकांचा फुगा कोणत्याही क्षणाला फुटेल, असे वाटत असताना उलट सेन्सेक्सने गुरुवारी त्याचा बहुप्रतीक्षित ५० हजारांचा टप्पा सकाळी बाजार सुरू होताच गाठला. मात्र या रूपातील गुंतवणूकदारांचा हर्षोल्लास सत्रअखेपर्यंत टिकू शकला नाही. नफेखोरीमुळे निर्देशांकाला ५० हजारांखाली आणताना त्यांनी सेन्सेक्सला सत्रअखेर बुधवारच्या तुलनेत काही प्रमाणात का होईना घसरण नोंदविण्यास भाग पाडले.

सलग दोन दिवसांच्या घसरणीनंतर बुधवारी नव्या शिखराकडे झेपावलेल्या प्रमुख निर्देशांकांची तेजी गुरुवारच्या सकाळच्या सत्रातही कायम राहिली. असे करताना नियमित व्यवहार सुरू होण्यापूर्वीच मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ५० हजारांपुढे गेला. मुंबई शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकाने २३ मे २०१९ पासून १० हजार अंशांची भर या दरम्यान घातली आहे.

सत्रअखेर निर्देशांक घसरले असले तरी सेन्सेक्सच्या ५० हजारांच्या स्पर्शाचा पहिला अनुभव गुंतवणूकदारांनी सत्रसमाप्तीनंतर दक्षिण मुंबईतील मुंबई शेअर बाजार इमारतीच्या प्रवेशद्वारावर साजरा केला. बाजाराचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशीष कुमार चौहान यांच्या उपस्थितीत या वेळी केक कापण्यात आला. तसेच इंग्रजी आकडय़ात ५०००० लिहिलेले पांढरे-निळे फुगे आकाशात उडविण्यात आले.

अनोख्या व वरच्या टप्प्याला पोहोचलेल्या भांडवली बाजारात नफा कमावून घेण्याची घाईमात्र गुंतवणूकदारांना रोखून धरता आली नाही. सत्रात ५०,१८४.०१ पर्यंत मजल मारल्यानंतर सेन्सेक्स व्यवहारात ४९,३९८.८६ पर्यंत घसरला. बुधवारच्या तुलनेत तो खाली, ४९,६२४.७६ पर्यंत आला. बंद होताना दिवसाच्या तुलनेत त्यात १६७.३६ अंश घसरण झाली. तेजी-घसरणीची प्रक्रिया राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनेही गुरुवारी पार पाडली. बुधवारच्या विक्रमानंतर १४,७३०.९५ ने सुरुवात करणारा निफ्टी सत्रात १४,७५३.५५ पर्यंत झेपावला. १४,५१७.२५ हा सत्रतळ गाठल्यानंतर तोही व्यवहारअखेर खाली आला. ५४.३५ अंश घसरणीसह निफ्टी १४,५९०.३५ वर बंद झाला. सेन्सेक्सप्रमाणेच निफ्टीही गुरुवारच्या व्यवहारात प्रथमच वरच्या टप्प्यावर – १४,७५० पुढे पोहोचला होता.

मुंबई शेअर बाजारातील महत्त्वाच्या घटना :

१८७५ – ३१८ सदस्यांनी दलाल संघटना स्थापन केली

१९५६ – मुंबई शेअर बाजाराची स्थापना

१९७७ – रिलायन्सची प्रारंभिक भागविक्री जाहीर

१९८६ – मुंबई निर्देशांक, सेन्सेक्सची सुरुवात

१९९३ – हर्षद मेहता घोटाळ्यामुळे १२.७७ टक्के आपटी

१९९५ – ऑनलाइन ट्रेडिंगसाठी बोल्ट अस्तित्वात

१९९६ – समभागांच्या हाताळणीसाठी एनएसडीएलची स्थापना

२००४ – काँग्रेसच्या लोकसभा विजयानंतर १५.५२ टक्के घसरण

२०१६ – नोटाबंदीच्या घोषणेनंतर १,६८६ अंश आपटी

२०२० – टाळेबंदी लागू झाल्यानंतर ३,९३५ अंश घसरण

सेन्सेक्सचे महत्त्वाचे टप्पे :

१०० – १ जानेवारी १९८६

१,००१ – २५ जुलै १९९०

५,००० – ११ ऑक्टोबर १९९९

१०,००० – ७ फेब्रुवारी २००६

२०,००० – ११ डिसेंबर २००७

२५,००० – १६ मे २०१४

४०,००० – २३ मे २०१९

४५,००० – ४ डिसेंबर २०२०

५०,००० – २१ जानेवारी २०२१

मुंबई निर्देशांकाचा लक्षणीय सत्रप्रवास :

४५,००० ते ४६,००० – ३ सत्र

४६,००० ते ४७,००० – ७ सत्र

४७,००० ते ४८,००० – ११ सत्र

४८,००० ते ४९,००० – ५ सत्र

४९,००० ते ५०,००० – ९ सत्र

सेन्सेक्स सात वर्षांत दुप्पट

देशातील सर्वात जुन्या भांडवली बाजार, मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स हा सर्वाधिक बाजार भांडवल राखणाऱ्या प्रमुख ३० कंपन्यांचा समावेश असलेला निर्देशांक आहे. १ जानेवारी १९८६ मध्ये १०० अंश पातळीने सुरुवात झाल्यानंतर २५ जुलै १९९० मध्ये प्रथमच तो चार आकडी अंकावर, १,००१ अंशांवर पोहोचला. ११ ऑक्टोबर १९९९ मध्ये तो ५,००० होता, तर ७ फेब्रुवारी २००६ मध्ये त्याने १०,००० चा टप्पा गाठला. मे २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदा सत्तेत आल्यापासून (२५,०००) निर्देशांक आता दुप्पट झाला आहे.

* ४५,००० ते ५०,००० दरम्यान ५,००० अंशांची भर घालण्यास सेन्सेक्सला महिन्याचाच कालावधी लागला.

* २०२१ मधील सात व्यवहारांत मुंबई निर्देशांकात १,५०० अंश भर पडली आहे.

* जागतिक प्रमुख निर्देशांकांत सर्वाधिक वाढ नोंदविणारा सेन्सेक्स (८०%) हा अमेरिकेच्या नॅसडॅकनंतरचा (८६%) निर्देशांक आहे.

* मुंबई शेअर बाजाराचे भांडवल आता अनोख्या अशा २०० लाख कोटी रुपयांपर्यंतपोहोचले आहे.

५० हजाराला वर्ष २०२० मध्ये हुलकावणी

करोनाच्या प्रारंभानंतर जाहीर झालेल्या टाळेबंदीदरम्यान सेन्सेक्स २५ हजारांवर आला होता. हा त्याचा वर्षांचा तळ ठरला. करोना आणि टाळेबंदीच्या प्रसारानंतर मात्र त्याची घोडदौड राहिली. असे करताना त्याने ४० हजारांपुढील टप्पाही गाठला. अनेक सत्रे ४५ हजारांपुढील स्तर कायम राखत असतानाच २०२० वर्षांच्या अखेरीस ५० हजारांचा टप्पा गाठेल, असे चित्र होते. मात्र त्याला हुलकावणी देऊनही निर्देशांक वार्षिक तुलनेत वर्षभरात १६ टक्क्यांनी वाढला.