ऐन दिवाळीच्या तोंडावर उच्चांकी शिखर गाठणाऱ्या मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक- ‘सेन्सेक्स’ने नव्या २०७० संवत्सराची सुरुवात २१,३२१ या व्यवहारातील ऐतिहासिक उच्चांकही सर करून साजरी केली. लक्ष्मीपूजनानिमित्त शेअर बाजारात झालेल्या सायंकालीन विशेष मुहूर्ताच्या व्यवहाराच्या पहिल्या पाच मिनिटांतच १२४.७२ अंशांनी झेप घेत सेन्सेक्सने हा उच्चांक गाठला. निफ्टीनेही तीन वर्षांपूर्वी गाठलेला उच्चांक रविवारच्या मुहूर्ताच्या व्यवहारात मोडून ६,३१७.३५ हे नवीन शिखर दाखविले.
रविवारी सायंकाळी ६.१५ ते ७.३० अशा सव्वा तासांच्या या विशेष व्यवहार सत्राची अखेर सेन्सेक्सने शुक्रवारच्या तुलनेत ४२.५५ अंशांच्या कमाईसह २१,२३९.३६ या पातळीवर स्थिरावून केली. निफ्टीनेही शुक्रवारच्या तुलनेत १०.१५ अंकांची भर घालत ६,३१५.३५ या उच्चांकावर विश्राम घेतला. निफ्टीने सार्वकालिक उच्चांकी बंद भाव गाठला असला तरी ८ जानेवारी २००८ रोजी स्थापित ६३५७.१० हा व्यवहारातील उच्चांक स्तर या निर्देशांकाला पार करता आला नाही.  देशांतर्गत अर्थव्यवस्थेत उत्साहवर्धक असे काहीही घडत नसले तरी विदेशी वित्तसंस्थांकडून सुरू असलेल्या निरंतर खरेदीच्या जोरावर, या आधीच्या सलग चार सत्रांत सेन्सेक्सने तब्बल ६२६.५३ अंकांची कमाई केली आहे. २००७ आणि २०१२ या सालांचा अपवाद केल्यास, दिवाळीतील मुहूर्ताच्या व्यवहारांत गेल्या १३ वर्षांत ११ वेळा सेन्सेक्सने वाढ दाखविली आहे. गेल्या दिवाळीत सेन्सेक्सचा मुहूर्ताचा स्तर १८६१८.८७ होता, त्यावरून तो २१,२३९.३६ म्हणजे २६२०.४९ अंकांनी वधारला आहे. म्हणजे सरलेल्या २०६९ संवत्सरात सेन्सेक्स १४.०७ टक्क्य़ांनी वधारला आहे. नववर्षांचा पहिला दिवस चोखंदळ खरेदी करीत साजरा करण्याची गुंतवणूकदारांत जशी परंपरा आहे, तसेच या दिवसात विक्री करून काही नफा गाठीशी बांधण्याचेही संकेत अनेक जण पाळतात. त्यामुळेच सव्वाशे अंशांच्या उसळीसह धमाकेदार सुरुवात करणाऱ्या सेन्सेक्सची तेजी सत्राअखेर काहीशी ओसरताना दिसली.
सोन्याने भाव कमावला!
*ऐन दिवाळीत आश्चर्यकारकरीत्या सलग सहा दिवस भाव पडत असलेल्या सोन्याने लक्ष्मीपूजनानिमित्त सराफ बाजारात झालेल्या सायंकालीन व्यवहारात मात्र भाव खाल्ला. बाजारात झालेल्या प्रतीकात्मक खरेदीपायी स्टँडर्ड सोन्याने प्रति १० ग्रॅमला ३०,४०० असा भाव रविवारी मिळविला.
*शनिवारच्या तुलनेत तो माफक ३० रुपयांनी वधारला. त्या उलट शुद्ध चांदीत आजही घसरण दिसून आली. चांदीचा किलोमागे भाव १३० रुपयांनी घसरताना दिसला.
*गेल्या दिवाळीत सोन्याने मुहूर्ताच्या व्यवहारात तोळ्यामागे ३१,७७५ रुपये असा भाव मिळविला होता, त्या तुलनेत यंदा मात्र तब्बल १,३७५ रुपयांनी तो घसरला आहे.
*संवत्सरात सोन्याचा भाव ओसरण्याचा प्रसंग विरळाच आणि गेल्या १५ वर्षांत सराफ बाजार पहिल्यांदाच तो
अनुभवत आहे.