आंतरराष्ट्रीय घडामोडींबाबत सकारात्मकता

मुंबई : चीनबरोबरचा व्यापार तणाव संपुष्टात आणण्याच्या अमेरिकी अध्यक्षांचे सूतोवाच तसेच ब्रिटनच्या निवडणूक निकालाने ब्रेग्झिटबाबतची स्पष्टतेच्या शक्यतेने संपूर्ण आशियाई बाजारात शुक्रवारअखेर तेजीचे वातावरण तयार झाले.

स्थानिक भांडवली बाजारातही देशातील फुगलेली महागाई आणि तळाला गेलेले औद्योगिक उत्पादन या नकारात्मक गोष्टी बेदखल करीत, आंतरराष्ट्रीय घडामोडींची सकारात्मकता दिसून आली. परिणामी सेन्सेक्स, निफ्टी निर्देशांक सप्ताहअखेर एक टक्क्याहून अधिक वाढ नोंदवत महत्वाच्या टप्प्यांपुढे गेले. शुक्रवारच्या व्यवहारात ४२८ अंशांची झेप घेत सेन्सेक्स ४१,००९.७१ वर तर ११४.९० अंश वाढीसह निफ्टी १२,०८६.७० पर्यंत झेपावला.

चालू आठवडय़ात दोन्ही निर्देशांक सव्वा टक्क्याहून अधिक वाढले. सेन्सेक्समध्ये  ५६४.५६ अंश भर पडली आहे, तर निफ्टी या दरम्यान १६५.२० अंशांनी वाढला आहे. मुंबई निर्देशांक सत्रात ४१,०५५.८० पर्यंत उंचावला होता.

सेन्सेक्समध्ये अ‍ॅक्सिस बँक, वेदांता, स्टेट बँक, मारुती सुझुकी, इंडसइंड बँक, येस बँक आदी जवळपास ३ टक्क्यांपर्यंत वाढले. तर भारती एअरटेल, कोटक महिंद्र बँक, बजाज ऑटो, एशियन पेंट्स, एचडीएफसी बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर आदींवर विक्री दबाव राहिला. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये पोलाद, स्थावर मालमत्ता, माहिती तंत्रज्ञान, वाहन, भांडवली वस्तू, बँक, वित्त आदी २.३० टक्क्यांपर्यंत वाढले. तर दूरसंचार निर्देशांक घसरणीच्या यादीत राहिला. मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप प्रत्येकी एक टक्क्यापर्यंत वाढले.