संभाव्य व्याजदर कपात अपेक्षित असलेल्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या नव्या द्वैमासिक पतधोरणपूर्वी गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारावर काहीसे चिंताग्रस्त वातावरणातच व्यवहार केले. त्याचबरोबर आशियाई बाजारातील संमिश्र तर युरोपीय बाजारातील नकारात्मक वाटचालीनंतर येथील प्रमुख निर्देशांकांमध्ये एक टक्क्य़ापर्यंत घसरण नोंदली गेली. आघाडीचे निर्देशांक यामुळे नव्या सप्ताहाच्या प्रारंभीच पंधरवडय़ाच्या नीचांकावर येऊन ठेपले. मुंबई निर्देशांकाने एकाच व्यवहारात जवळपास २५० अंश आपटी नोंदविली. तर निफ्टीने ७,८०० चा टप्पाही सोडला.
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २४६.६६ अंश घसरणीसह : २५,६१६.८४ पर्यंत खाली आला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ७२.८० घसरण नोंदली जाऊन निर्देशांक ७,७९५.७० वर येऊन ठेपला.
नव्या सप्ताहाची सुरुवात करताना सेन्सेक्स २५,९२२.७१ या वरच्या टप्प्यावर होता. सत्रात तो २५,९३६.८९ पर्यंत उंचावला. बाजारातील ऑक्टोबर महिन्याच्या वायदापूर्तीचाही हा पहिलाच दिवस होता. यानंतर मात्र बाजारात घसरण येऊन निर्देशांक २५,५९३.५६ पर्यंत घसरला. दिवसअखेरही घसरणीसह बंद झालेल्या मुंबई निर्देशांकाने ११ सप्टेंबर रोजीच्या २५,६१०.२१ नजीकचा टप्पा सोमवारी राखला.
दरम्यान राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने सोमवारी ७,८९३.९५ पर्यंत मजल मारल्यानंतर ७,८०० चा टप्पा सोडला. व्यवहारात निफ्टी ७,७९५.७० पर्यंत घसरला होता. सेन्सेक्समधील २४ समभागांचे मूल्य घसरले होते. मुंबई शेअर बाजारातील स्मॉल व मिड कॅप निर्देशांकही पाव टक्क्य़ापर्यंत खाली आले होते.
रिझव्‍‌र्ह बँकेचे द्वैमासिक पतधोरण मंगळवार, २९ सप्टेंबर रोजी जाहीर होत आहे. यात गव्हर्नर डॉ. राजन किमान पाव टक्क्य़ाची कपात करण्याची तमाम तज्ज्ञांची अटकळ आहे.