सेन्सेक्स, निफ्टीचा उत्साहवर्धक सप्ताह प्रवास

मुंबई : दशकातील सर्वोत्तम प्रवास देशातील प्रमुख निर्देशांकांनी नोंदविला आहे. चालू आठवडय़ातील सलग चारही व्यवहारात तेजी नोंदविणाऱ्या भांडवली बाजारांची यंदाची कामगिरी एप्रिल २००९ नंतरची सर्वोत्तम ठरली आहे.

सप्ताहअखेर सेन्सेक्स एकाच सत्रात ९९७.४६ अंशांनी झेपावत थेट ३३,७१७.६२ पर्यंत पोहोचला. तर ३०६.५५ अंश वाढीने निफ्टी ९,८५९.९० वर स्थिरावला.

गुरुवारी भांडवली बाजारात महिन्यातील वायदापूर्तीचे तसेच चालू सप्ताहातील अखेरच्या सत्रातील व्यवहार झाले. या दरम्यान मुंबई व राष्ट्रीय शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांमध्ये प्रत्येकी ७ टक्क्य़ांहून अधिक झेप नोंदली गेली. निफ्टीने एप्रिल २००९ नंतरची सर्वोत्तम मासिक निर्देशांक वाटचाल नोंदविली.

रुपयाही सप्ताहअखेर भक्कम बनला. तर खनिज तेलाच्या किमती पुन्हा वाढल्या.

गुंतवणूकदार ७.६८ लाख कोटींनी श्रीमंत

सलग चार व्यवहारांतील निर्देशांक तेजीमुळे मुंबई शेअर बाजारातील गुंतवणूकदार या दरम्यान ७.६८ लाख कोटी रुपयांनी श्रीमंत झाले. भांडवली बाजारात सूचिबद्ध कंपन्यांचे समभाग मूल्य गुरुवारअखेर १.२९ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. चालू सप्ताहातील चारही व्यवहारात मिळून मुंबई निर्देशांक २,३९०.४० अंशांनी उंचावला आहे. चालू आठवडय़ात भांडवली बाजारात चारच दिवस व्यवहार झाले. भांडवली बाजारात कामगार दिनानिमित्त शुक्रवारी व्यवहार होणार नाहीत.

प्रमुख क्षेत्रात मार्चमध्ये घसरण

नवी दिल्ली : टाळेबंदी लागू झालेल्या महिन्यात प्रमुख क्षेत्राची वाढ खुंटली आहे. प्रमुख आठ क्षेत्राची वाढ मार्चमध्ये ६.५ टक्क्य़ांनी रोडावली आहे. खनिज तेल, नैसर्गिक वायू, इंधन शुद्धीकरण उत्पादन, खते, स्टील, सिमेंट आणि विद्युत निर्मिती क्षेत्रात उतार नोंदला गेला आहे. तर कोळसा उत्पादन निम्म्यावर आले आहे. वर्षभरापूर्वी, मार्च २०१९ मध्ये प्रमुख आठ क्षेत्र ५.८ टक्क्य़ाने विस्तारले होते. तर एप्रिल २०१९ ते मार्च २०२० दरम्यान ते ०.६ टक्के राहिले आहे.