सेन्सेक्सची २०१६ मधील सप्ताह चमकदार कामगिरी
जागतिक बाजारांच्या तेजीवर स्वार होत मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने शुक्रवारी एकाच व्यवहारात तब्बल ४०१ अंश उसळी नोंदविली. याचबरोबर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ७,५०० पार झाला. जवळपास दोन टक्क्यांच्या वाढीच्या जोरावर प्रमुख निर्देशांकांनी आठवडाअखेर २०१६ मधील पहिली सप्ताह झेप राखली आहे.
गेल्या आठवडय़ापासून बाजारात कमालीची मरगळ होती. परिणामी, सेन्सेक्स अगदी २४,५०० च्याही खाली उतरला होता. तर चालू आठवडय़ात सेन्सेक्समध्ये ४३५.०३ अंश वाढ झाली आहे, तर निफ्टी या कालावधीत १४१.१० अंशांनी वाढला आहे.
२९ जानेवारी २०१५ पासून मुंबई निर्देशांक ४,८११.०८ अंशांनी खाली आला आहे. याच दरम्यान सेन्सेक्स २९,६८१.७७ या सर्वोच्च टप्प्यावर होता.
फेब्रुवारीतील वायदापूर्तीचा बाजारात शुक्रवारचा पहिला दिवस होता, तर आशियाई भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांकात सप्ताहअखेरच्या व्यवहारात तेजीचे वातावरण होते. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर पुन्हा वाढू लागल्याने तसेच बँक ऑफ जपानच्या उणे व्याजदर पतधोरणचे येथेही स्वागत झाले. रिझव्‍‌र्ह बँकेचे पतधोरणही येत्या आठवडय़ात येऊ घातले आहे.
आठवडय़ाच्या शेवटच्या सत्रातील सुरुवात काहीशी घसरणीने करताना सेन्सेक्स शुक्रवारी २४,३४७.३१ सह वाटचाल करता झाला, मात्र लगेचच तो २४,९११.९० पर्यंत झेपावला. दिवसअखेर त्यात गुरुवारच्या तुलनेत ४०० हून अधिक अंशांची वाढ नोंदली गेली.
सुरुवातीपासूनच्या तेजीमुळे राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी निर्देशांकालाही सत्रअखेर ७,५०० पुढील टप्पा राखता आला. व्यवहारात प्रमुख निर्देशांक ७,५७५.६५ पर्यंत उंचावला, तर मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप अनुक्रमे दोन व एक टक्क्यांनी वाढले होते.
सेन्सेक्समधील कोल इंडिया, हिरो मोटोकॉर्प, सन फार्मा, हिंदुस्थान यूनिलिव्हर, डॉ. रेड्डीज, बजाज ऑटो हे मूल्यवाढ नोंदविणारे समभाग ठरले. स्टेट बँक, टाटा स्टील, एनटीपीसी, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल हे पाच समभाग वगळता मुंबई निर्देशांकातील ३० पैकी उर्वरित समभाग वाढले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये ग्राहकोपयोगी वस्तू, आरोग्यनिगा, माहिती तंत्रज्ञान, भांडवली वस्तू, वाहन, पोलाद आदी निर्देशांक चमकले.
आशियाई बाजारात शांघाय, हँग सेंग याचबरोबर जपान, सिंगापूर, तैवान, दक्षिण कोरिया येथील प्रमुख निर्देशांक २.८० टक्क्यांपर्यंत वाढले. युरोपीय बाजारातील सुरुवातीचे वातावरणही तेजीचे होते. अमेरिकेतील बाजारातही डाऊ जोन्स, एस अ‍ॅण्ड पी५०० वगैरे एक टक्क्यापर्यंत वाढ नोंदवीत होते. मंगळवारच्या पतधोरणावर नजर ठेवून येत्या सप्ताहारंभीचे व्यवहार बाजारात होतील.

रुपया भक्कम
गेल्या तीन व्यवहारातील रुपयातील कमकुवता अखेर शुक्रवारी संपुष्टात आली. डॉलरच्या तुलनेत रुपया सप्ताहातील शेवटच्या व्यवहारात ४५ पैशांनी उंचावत ६७.७८ पर्यंत गेला. भांडवली बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचा ओघ पुन्हा सुरू झाल्याचे पडसाद परकी चलन विनिमय मंचावर पडले. चलनाचा प्रवास ६८.१० या वाढीसह सुरू होत सत्रात वधारत गेला. रुपयाने गेल्या सलग तीन व्यवहारात ६० पैशांची आपटी अनुभवली आहे.