सेन्सेक्सची ३७५ अंशांनी झेप; निफ्टी १०,९०० पुढे

व्यापार प्रतिनिधी, मुंबई</strong>

सरकारकडून अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी आणखी काही उपाययोजनांबाबत आशावाद आणि चीन-अमेरिका महासत्तांमधील व्यापार युद्ध शमण्याच्या संकेताने सुखावलेल्या जागतिक बाजारांचा पाठपुरावा करीत, स्थानिक भांडवली बाजारात शुक्रवारच्या व्यवहारात खरेदीचा उत्साह दिसून आला.

गुंतवणूकदारांकडून खरेदीचे पाठबळ मिळाल्याने सेन्सेक्स ३३७.३५ अंशांची झेप घेत ३६,९८१.७७ अंशांवर, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने ९८.३० अंशांच्या उसळीसह १०,९४६.२० अंशांवर विश्राम घेतला. दोन्ही निर्देशांकांनी सप्ताहअखेर ही प्रत्येकी ०.९२ टक्के उसळीसह केली. तथापि, सार्वजनिक सुट्टय़ांमुळे आक्रसलेल्या सप्ताहाच्या व्यवहारात, सेन्सेक्स, निफ्टीमध्ये अनुक्रमे ०.९४ टक्के आणि ०.६९ टक्के अशी साप्ताहिक घसरण दिसून आली.

शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी वाहन उद्योगातील समभागांना चांगली मागणी दिसून आली. गुरुवारी नितीन गडकरी यांनी ‘सियाम’च्या संमेलनात जीएसटी दर कपातीची उद्योगाकडून होत असलेल्या मागणीचा अर्थमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली. तर शुक्रवारी अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी सर्व ते सहकार्याची तयारी ‘अ‍ॅक्मा’ या वाहनपूरक उद्योगाच्या संमेलनात बोलताना दर्शविली. त्या परिणामी ‘सेन्सेक्स’च्या ३० समभागांमधील मारुती सुझुकी (३.६१ टक्के), बजाज ऑटो (२.९० टक्के), टाटा मोटर्स (२.५८ टक्के), महिंद्र अँड महिंद्र (२.३४ टक्के) आणि हीरो मोटोकॉर्प (२.१४ टक्के) अशी दमदार मूल्यवाढ दर्शविली.

मागील दोन आठवडय़ात शुक्रवारी सायंकाळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थप्रोत्साहक उपायांची पत्रकार परिषद घेऊन घोषणा केल्या आहेत. या आठवडय़ात आणखी काही उपाययोजना अर्थमंत्र्यांकडून जाहीर होतील, या अपेक्षेने सकाळच्या सत्रापासून बाजारातील व्यवहारात उत्साह होता. मात्र अपेक्षेप्रमाणे अर्थमंत्र्यांकडून तसे कोणत्याही घोषणा शुक्रवारी केल्या नाहीत. तरी जागतिक स्तरावरील सकारात्मकता खरेदी उत्साह कायम ठेवण्यास मदतकारक ठरली. मात्र, करभार कमी करणारा अर्थमंत्र्यांकडून निर्णय होऊनही, विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून सलगपणे बाजारात विक्रीचा जोर कायम आहे, असे जिओजित फायनान्शिय सव्‍‌र्हिसेसचे संशोधनप्रमुख विनोद नायर यांनी सांगितले.