14 December 2017

News Flash

सरकारचे स्वागत!

बुधवारच्या घसरणीनंतर शेअर बाजाराने गुरुवारी पुन्हा उत्साही तेजी नोंदविली. अनुदानाचा भार कमी करण्यासाठी डिझेलच्या

व्यापार प्रतिनिधी, मुंबई | Updated: January 18, 2013 1:10 AM

बुधवारच्या घसरणीनंतर शेअर बाजाराने गुरुवारी पुन्हा उत्साही तेजी नोंदविली. अनुदानाचा भार कमी करण्यासाठी डिझेलच्या किंमती निर्नियंत्रित करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे विशेषत: तेल व वायू क्षेत्रातील समभागांमध्ये झालेल्या उत्साहवर्धक खरेदीमुळे ‘सेन्सेक्स’मध्ये १४६.४० अंशांची भर पडली. यामुळे हा निर्देशांक पुन्हा २० हजाराच्या उंबऱ्यावर १९,९६४.०३ वर पोहोचला. तर कालच्या घसरणीनंतरही ६,००० वर असणारा राष्ट्रीय शेअर बाजाराचा ‘निफ्टी’ ३७.३५ अंश वाढीनंतर दिवसअखेर ६,०३९.२० वर स्थिरावला.
गुरुवारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयांपायी  तेल व वायू क्षेत्रातील अग्रणी ओएनजीसीचा समभाग ३ टक्क्यांनी वधारला. सरकारी तेल वितरण कंपन्यांच्या समभागांनी तर प्रत्येकी ६ टक्क्यांहून अधिक मुसंडी मारली. तर खाजगी क्षेत्रातील रिलायन्सच्या समभागाचे मूल्य ३.४ टक्क्यांनी वधारले. हे दोन्ही समभाग ‘सेन्सेक्स’मध्ये ८० टक्के हिस्सा राखतात.
इन्फोसिस, टीसीएस, एचसीएल टेक वगैरे कंपन्यांच्या वधारत्या फायद्यातील तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या हिंदोळ्यावर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागही गुरुवारी तेजीत होते.
सीडीएमए तंत्रज्ञानावरील दूरसंचार परवान्यासाठी किंमत निम्म्यावर आणण्याच्या सरकारच्या पावलाचेही या क्षेत्रातील कंपन्यांनी भांडवली बाजारावर स्वागत केले.
रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डी. सुब्बराव यांनी काल वाढत्या महागाईची चिंता व्यक्त केल्यानंतर भांडवली बाजारांनी बुधवारच्या व्यवहारात घसरण नोंदविली होती. मुंबई निर्देशांक तर १६९ अंशांनी खाली आला होता. तत्पूर्वी सलग तीन सत्रातील तेजीमुळे ‘सेन्सेक्स’ २० हजाराच्या टप्प्यात तर ‘निफ्टी’ ६ हजाराच्या वर होता. या तीनही सत्रात शेअर बाजार ३२४ अंशांनी उंचावला होता. दरम्यान त्याने व्यवहारात २० हजारापर्यंत मजल मारताना दोन वर्षांच्या उच्चांकालाही गाठले होते.
डिझेल नियंत्रणमुक्ततेचा परिणाम

First Published on January 18, 2013 1:10 am

Web Title: share market welcome the government decision