आपल्या जुन्या ग्राहकांच्या निष्ठेला सलाम आणि ग्राहकांचे वय जितके अधिक तितकी सवलत देणारी अनोखी योजना टीबीझेड अ‍ॅण्ड ब्रदर्स या जुन्या सराफपेढीने आपल्या निर्मल लाइफस्टाइल, मुलुंड (प.) स्थित दालनात दिवाळीनिमित्त सुरू केली आहे. ‘जुनं ते सोनं’ असे नामाभिधान असलेल्या या योजनेत ग्राहकांना हॉलमार्क प्रमाणित सोन्याच्या दागिन्यांसाठी प्रति ग्रॅम सरसकट २९९ रुपये असा सरसकट घडणावळ खर्च आकारला जाईल. यातून ग्राहकांचे वय वजा करून जी रक्कम येईल तितकेच घडणावळ शुल्क आकारले जाईल. शिवाय त्यावर आणखी पाच टक्क्यांची सवलत जर ग्राहक या पेढीचा जुना ग्राहक असल्यास मिळवू शकेल. येत्या ५ नोव्हेंबपर्यंत ही ऑफर सुरू राहील.

‘मलाबार’चे ऑनलाइन दालन
 जगातील मोजक्या बडय़ा हिरेजडित आभूषणांच्या विक्रेत्यांपैकी एक असलेल्या मलाबार गोल्ड अ‍ॅण्ड डायमंड्सने आपल्या २० व्या वर्धापनदिनानिमित्ताने ‘माइन डायमंड’ हे हिरेजडित दागिन्यांचे विशेष दिवाळी कलेक्शन प्रस्तुत केले. शिवाय, हे दागिने आता  http://www.shopmgd.com या ऑनलाइन दालनामार्फत ग्राहकांपर्यंत पोहचणार आहेत. बॉलीवूड अभिनेत्री करिना कपूर हिने मलाबारचे हे नवे कलेक्शन आणि ऑनलाइन दालनाचे सोमवारी मुंबईत अनावरण केले.

स्थापनादिनानिमित्त सिंडिकेट बँकेकडून संयुक्त ग्राहकसभांचे आयोजन
मुंबई: सार्वजनिक क्षेत्रातील सिंडिकेट बँकेने आपला ८८ वा स्थापना दिवस देशभरात संयुक्त ग्राहकसभांचे आयोजन करून साजरा केला. बँकेच्या मुंबई विभागातील सर्व शाखांमधील ग्राहकांच्या सभेचे आयोजन माटुंगा जिमखाना सभागृह येथे करण्यात आले होते. ग्राहकांची बँकेच्या सेवाविषयींचे अभिप्राय आणि त्यात सुधारणेच्या दृष्टीने त्यांच्या मौलिक सूचना लक्षात घेणाऱ्या या सभेत सिंडिकेट बँकेचे मुंबई विभागाचे महाव्यवस्थापक व्ही. गणेशन, आंतरराष्ट्रीय विभागाचे महाव्यवस्थापक उदय शंकर मजुमदार यांनी ग्राहकांशी संवाद साधला. स्थापनादिनानिमित्त झालेल्या उपक्रमाअंतर्गत बँकेने जे जे रुग्णालय रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट स्थानकात दिवसभरासाठी रक्तदान शिबिराचेही आयोजन केले होते.

टॅब्लेटच्या प्रांगणाचा  १० इंची विस्तार!
मुंबई: दक्षिण कोरियातील तंत्रज्ञान अग्रणी सॅमसंगने मुंबईत मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत आपल्या ‘गॅलेक्सी नोट १०.१’चे भारतात अनावरण केले. हे ३२ जीबी क्षमतेचे गॅलेक्सी नोट हे ‘मल्टिटास्किंग’ कार्यकुशलतेसाठी आणि मोठय़ा १० इंची स्क्रीनमुळे व चौपट अधिक पिक्सेल डेन्सिटीसह सुस्पष्ट दृश्यमानता अशा वैशिष्टय़ांसह आले आहे. गॅलेक्सी नोट एस-३ मध्ये असलेल्या ‘एस पेन’ आणि ‘एस नोट’ अशा सुधारित अधिक सक्षमरीत्या यात सामावण्यात आल्या आहेत. उल्लेखनीय म्हणजे रु. ४९,९९० या किमतीसह हे सध्याच्या घडीला भारतात उपलब्ध झालेले सर्वात महागडे टॅब्लेट असून, ते आजवर अप्रयुक्त राहिलेल्या आणि प्रीमियम बाजारहिश्शाला कवेत घेईल, असा विश्वास सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे टॅब्लेट व्यवसायाचे महाव्यवस्थापक आनंद धांद यांनी अनावरणप्रसंगी बोलताना सांगितले.