वित्तीय क्षेत्रातील ‘आयएल अ‍ॅण्ड एफएस’ येत्या रविवारी (२३ फेब्रुवारी) ‘मिनी मॅरेथॉन’चे आयोजन करण्यात आले आहे. ‘आय रन फॉर फन’ या ब्रीदसह होणाऱ्या या धाव स्पर्धेत वांद्रे – कुर्ला व्यापारी संकुलातील विविध कंपन्यांमधील सुमारे २,००० हून अधिक उद्योगपती, सार्वजनिक तसेच खासगी कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होतील. ५ आणि १० किलो मीटर अंतरासाठीच्या स्पर्धेकरिता वित्तसंस्थेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आर. सी. बाबा, बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षा विजयलक्ष्मी अय्यर, बँक ऑफ बडोदाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक एस. एस. मुंद्रा हे हिरवा झेंडा दाखवतील. वित्तसंस्थेतील कर्मचारी व संकुलातील इतर कंपन्यांमधील कर्मचारी यांना एकत्र आणण्याचा विचार यामागे असल्याचे मुंद्रा यांनी सांगितले. स्पर्धेसाठी sudakshina.bhattacharya@ilfsindia.com या ईमेलवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शिक्षण कर्ज सुविधेसाठी अ‍ॅव्हान्स आणि फ्रँकफर्ट स्कूलचे सामंजस्य
विदेशातील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज पुरवठय़ा अग्रणी अ‍ॅव्हान्स एज्युकेशन लोन्सने जर्मनीत फ्रँकफर्ट मेनस्थित आघाडीची व्यवस्थापन संस्था फ्रँकफर्ट स्कूल ऑफ फायनान्स अँड मॅनेजमेंटमध्ये भारतीय विद्यार्थ्यांचा प्रवेश सुकर व्हावा, यासाठी या शिक्षणसंस्थेशी सामंजस्याचा करार केला आहे. शिक्षणशुल्क साधारण १० हजार युरो आणि निवास व अन्य खर्च अंदाजे ३५ हजार युरो असे सुमारे ४५ हजार युरो अर्थात ७०-७२ लाख रुपये इतका १०० टक्के अर्थपुरवठा यातून अ‍ॅव्हान्सकडून केला जाईल. अ‍ॅव्हान्सची ही पहिली जागतिक शैक्षणिक भागीदारी असून, भारतात विविध पारंपरिक व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या ४०० संस्थाबरोबर तिने याच प्रकारची भागीदारी केली आहे.

निवड-नियुक्ती
एक्झिम बँकेच्या अध्यक्षपदी यदुवेंद्र माथूर
आयात निर्यात क्षेत्रातील आघाडीची सरकारी वित्तीय संस्था असलेल्या एक्झिम बँकेच्या (एक्स्पोर्ट-इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी यदुवेंद्र माथूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते यापूर्वी २०११ पासून राजस्थान फायनान्शिअल कॉर्पोरेशनचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी पाहत होते. भारतीय प्रशासन सेवेतील १९८६ च्या तुकडीचे माथूर अर्थशास्त्र विषयात प्रथम श्रेणीतील पदवीधर व वित्त विषयातील व्यवसाय व्यवस्थापन विषयातील पदव्युत्तर शिक्षण घेणारे वरिष्ठ अधिकारी आहेत. १९८४ मध्ये भारतीय महसूल सेवेत रुजू होण्यापूर्वी माथूर यांनी दोन वर्षे गोल्डन टोबॅको व सहयोगी सीमेंट कंपनीत कार्य केले आहे.
सुश्मिता सेनगुप्ता
महानगर गॅसच्या तांत्रिक संचालिका मुंबई व आसपास घरोघरी पाइपद्वारे स्वयंपाकाचा गॅस पोहोचविणाऱ्या महानगर गॅस लिमिटेड कंपनीच्या तांत्रिक संचालक म्हणून सुश्मिता सेनगुप्ता यांनी अलीकडेच कार्यभार स्वीकारला. गेली सहा वर्षे हे पद सांभाळणारे अ‍ॅलन पेरीन नुकतेच सेवानिवृत्त झाले. सेनगुप्ता यांच्याकडे तेल व वायू क्षेत्रातील तब्बल २५ वर्षांचा अनुभव आहे.

रेड्डी ‘एमएमआरडीए’चे अतिरिक्त महानगर आयुक्त
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अतिरिक्त महानगर आयुक्त पदाचा कार्यभार बी. वेणुगोपाळ रेड्डी यांनी अलीकडेच स्वीकारला. रेड्डी हे भारतीय प्रशासन सेवेतील १९९४ च्या तुकडीचे अधिकारी असून, यापूर्वी जून २०१० पासून ते नागपूरचे विभागीय आयुक्त म्हणून काम पाहत होते. कृषी विषयात पदव्युत्तर पदवी मिळविलेल्या रेड्डी यांनी राज्यात सोलापूर आणि गडचिरोली येथे जिल्हाधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.

‘महापारेषण’च्या प्रमुखपदी  बिपीन श्रीमाळी
ल्ल महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीचे (महापारेषण) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अरविंद सिंह हे परराष्ट्र व्यवहार विभागात जपान येथे प्रतिनियुक्तीवर गेले असल्याने रिक्त झालेल्या पदावर बिपीन श्रीमाळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीमाळी यांनी अलीकडेच या पदाचा कार्यभार स्वीकारला. ते भारतीय प्रशासन सेवेतील १९९२ सालच्या तुकडीतील महाराष्ट्र संवर्गाचे अधिकारी आहेत.