मुंबई : जुलै महिन्यात मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वाचा पहिला अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर भांडवली बाजारात निरंतर घसरण सुरू असूनही गुंतवणूकदारांकडून निधीचा ओघ कायम असल्याचे दिसून आले आहे. परिणामी म्युच्युअल फंडाकडे जमा मालमत्ता २४.५३ लाख कोटी रुपये अशी किंचित घटली असली तरी, नियोजनबद्ध गुंतवणूक पद्धत अर्थात ‘एसआयपी’मार्फत गुंतवणुकीचा ओघ विक्रमी ८,३२४ कोटी रुपयांवर गेला आहे.

सरलेल्या जूनअखेर म्युच्युअल फंड गंगाजळी २५.५१ लाख कोटी रुपये होती, तर ‘एसआयपी’ गुंतवणुकीचा ओघ ८,१२२ कोटी रुपयांवर होता.

जुलै महिन्यात गुंतवणूकदारांची पसंती अनुक्रमे लार्जकॅप फोकस्ड आणि मिडकॅप फंडांना लाभल्याचे म्युच्युअल फंडांची शिखर संघटना असलेल्या ‘अ‍ॅम्फी’ने जाहीर केलेल्या जुलै महिन्याच्या आकडेवारीत दिसून आले आहे.

नियोजनबद्ध गुंतवणूक पद्धत म्हणजे ‘एसआयपी’च्या माध्यमातून होणारी गुंतवणूक सार्वकालिक उच्चांकावर असून गुंतवणुकीत सतत वाढ होताना दिसत आहे. जुलै महिन्यातील एसआयपी गुंतवणूक ८,३२४.२८ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. जुलै महिन्याच्या म्युच्युअल फंडातील निधी ओघावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ‘अ‍ॅम्फी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. एस. वेंकटेश म्हणाले, ‘‘बाजारात अस्थिरतेमुळे गुंतवणूक करण्यास उत्साहवर्धक वातावरण नसतानाही  म्युच्युअल फंडांबाबत गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मकता आहे. समभाग गुंतवणूक करणाऱ्या फंडातील नियोजनबद्ध गुंतवणुकीने तीन वर्षांतील उच्चांक गाठला आहे.’’