नफ्याची मोठी अपेक्षा असलेल्या आघाडीच्या कंपन्यांनी तिमाही निकालांमध्ये निराशा केल्याने एकूणच मुंबई शेअर बाजारावर त्याचा परिणाम आठवडाअखेर दिसून आला. सलग दुसऱ्या सत्रात घसरण नोंदविणारा ‘सेन्सेक्स’ यामुळे १८,७००च्या खाली जाऊन विसावला, तर ‘निफ्टी’ ५२.५० अंश घसरणीसह ५,६८६.२५ वर स्थिरावला.
आघाडीच्या स्टेट बँकेने नफ्यातील ३० टक्के वाढ नोंदविली असली तरी दुसऱ्या तिमाहीत तिचे बुडीत कर्जाचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढले आहे. यामुळे बँकेचा समभाग आज ३.८९ टक्क्यांनी खाली आला. त्याचबरोबर सार्वजनिक क्षेत्रातील ओएनजीसीनेही काल गेल्या चार वर्षांतील सर्वात सुमार नफा कमावल्याचा परिणाम कंपनीचे समभाग मूल्य ३.०५ टक्क्यांनी कमी नोंदविण्यावर झाला. टाटा स्टीलचा तोटाही तिमाहीत २१२.४० कोटीवरून ३६३.९० कोटी रुपयांवर विस्तारला गेला आहे. यामुळे हा समभागही ३.२ टक्क्यांनी खाली आला.

स्टेट बँक घसरला
चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीचे वित्तीय निष्कर्ष जाहीर करताना बुडित कर्जात वाढ नोंदली गेल्याने भारतीय स्टेट बँकेचा समभागही ४ टक्क्यांनी घसरला होता. बँकेच्या वाढत्या बुडित कर्जाबद्दल गुंतवणूकदारांनी चिंता व्यक्त करत समभागांची जोरदार विक्री केल्याने ‘सेन्सेक्स’वर त्याला २,१५६.३५ रुपये भाव मिळाला. यामुळे कंपनीचे बाजारमूल्यही ५,८५२ कोटी रुपयांनी कमी होऊन ते १,४४,७०० कोटी रुपयांवर आले.