६ सेन्सेक्सची दुसरी मोठी निर्देशांक आपटी; ६ गुंतवणूकदारांना ७.६२ लाख कोटींचा फटका ६ निफ्टीही खाली

मुंबई : आठवडय़ाच्या आत सेन्सेक्सच्या रूपात दुसरी मोठी निर्देशांक आपटी नोंदविणाऱ्या मुंबई शेअर बाजारात गुंतवणूकदारांना सप्ताहारंभीच ७.६२ लाख कोटी रुपयांचा फटका बसला. भारतात गंभीर स्थिती उत्पन्न होत असलेल्या करोना विषाणूबाबतची तीव्र चिंता आठवडय़ाच्या पहिल्याच व्यवहारात भांडवली बाजारात उमटली.

गेल्या शुक्रवारच्या तुलनेत सेन्सेक्स सोमवारी २,७१३.४१ अंशांनी आपटत ३१,३९०.०७ पर्यंत येऊन ठेपला. तर निफ्टीत एकाच व्यवहारात ७५७.८० अंश आपटीमुळे राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक ९,१९७.४० वर स्थिरावला. दोन्ही निर्देशांक जवळपास ८ टक्क्यांपर्यंत आपटले.

नव्या सप्ताहाची सुरुवात करतानाच दोन्ही प्रमुख निर्देशांक सकाळच्या सत्रात घसरणीने सुरू झाले. सेन्सेक्सने या वेळी शुक्रवारअखेरचा ३४ हजाराचा तर निफ्टीने १० हजाराचा स्तर सोडला.

मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल सोमवारअखेर एकाच व्यवहारात ७.६२ लाख कोटी रुपयांनी रोडावत १२१.६३ लाख कोटी रुपयांवर येऊन ठेपले. सेन्सेक्समध्ये सर्व, ३० कंपन्यांचे समभाग मूल्य घसरले. तर मुंबई शेअर बाजारातील सर्व क्षेत्रीय निर्देशांकही घसरणीच्या यादीत राहिले. मिड कॅप व स्मॉल कॅप ६ टक्क्यांपर्यंत आपटले.

आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमतीत उतार दिसून आला. काळ्या सोन्याचे दर प्रति पिंप ३२ डॉलपर्यंत खाली आले आहेत. तर डॉलरच्या तुलनेत रुपया सोमवारी ५० पैशांनी घसरून ७४.२५ वर थांबला.

येस बँक :

भांडवली बाजारात निर्देशांकांची पडझड सुरू असताना खासगी क्षेत्रातील येस बँकेचा समभाग मात्र सत्रअखेर ४५ टक्क्य़ांनी झेपावला. स्टेट बँकेचे मोठे अर्थसहाय्य लाभलेल्या सध्या र्निबधाखाली असलेल्या बँकेचा समभाग व्यवहारात थेट ५८.१२ टक्क्य़ांनी झेपावला होता.

एसबीआय कार्ड्स :

सेन्सेक्ससह निफ्टीने दुसरी मोठी निर्देशांक आपटी नोंदविली असताना एसबीआय कार्ड्स अँड पेमेंट सव्‍‌र्हिसेसलाही घसरणछायेला सामोरे जावे लागले. सप्ताहारंभी नोंद होताना प्रारंभिक खुल्या भागविक्री प्रक्रियेत गुंतवणूकदारांचा दमदार प्रतिसाद लाभलेला समभाग जारी किंमतीपैक्षा १० टक्के खाली नोंद करता झाला.