सेन्सेक्स, निफ्टीची विक्रमी धाव सुरूच!

मुंबई : सेन्सेक्स तसेच निफ्टी या प्रमुख निर्देशांकांनी मंगळवारी सलग दुसऱ्या सत्रात सार्वकालिक उच्चांकी टप्प्याची नोंद केली. कंपन्यांच्या तिमाही वित्तीय निष्कर्षांमधील आशादायी फेर पाहता,   गुंतवणूकदारांकडून झालेल्या उत्साही समभाग खरेदी आठवडय़ाच्या दुसऱ्या सत्रातही कायम राहिल्याने हे शक्य झाले.

मंगळवारच्या व्यवहारात ४२ हजारांच्या उंबरठय़ावर पोहोचणारा सेन्सेक्स सोमवारच्या तुलनेत ९२.९४ अंश वाढ नोंदवीत ४१,९५२.६३ वर पोहोचला. परिणामी, मुंबई निर्देशांकाने सोमवारी नोंदविलेला ऐतिहासिक विक्रम मंगळवारी मागे पडून नवा स्तर नोंदला गेला.

व्यवहारातील दिवसभराच्या तेजीनंतरही सेन्सेक्स मंगळवारअखेर निर्देशांक वाढीसह ४२ हजारांच्या उंबरठय़ावर स्थिर राहिला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी निर्देशांकात मंगळवारी ३२.७५ अंश वाढ होऊन तो १२,३६२.३० पर्यंत पोहोचला. सत्रात त्याची झेप १२,३७४.२५ पर्यंत होती.

वर्ष २०१९ अखेर वाढलेल्या महागाई दराकडे दुर्लक्ष करत विपरीत परिस्थितीतही कंपन्यांकडून तिसऱ्या तिमाहीत नफावृद्धी नोंदली जात असल्याचे स्वागत गुंतवणूकदारांनी केले. सेन्सेक्समधील हीरो मोटोकॉर्प २ टक्के वाढीसह प्रमुख निर्देशांकात अग्रणी राहिला.

याचबरोबर आयटीसी, एनटीपीसी, महिंद्र अँड महिंद्र, टेक महिंद्र, अ‍ॅक्सिस बँक, नेस्ले इंडिया, एचडीएफसी लिमिटेड, टीसीएस यांचे मूल्य जवळपास दोन टक्क्यांपर्यंत वाढले. तर इंडसइंड बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, कोटक महिंद्र बँक, स्टेट बँक, लार्सन अँड टुब्रो,  आयसीआयसीआय बँक आदी ४ टक्क्यांपर्यंत घसरले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये पोलाद, माहिती तंत्रज्ञान, वाहन, ऊर्जा, बहुपयोगी वस्तू, आरोग्यनिगा निर्देशांक १.४६ टक्क्यांपर्यंत वाढले. तर बँक, स्थावर मालमत्ता, भांडवली वस्तू हे अन्य क्षेत्रीय निर्देशांक अर्ध्या  टक्क्यापर्यंत घसरले. मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप पाऊण टक्क्यांपर्यंत वाढले.