‘सेन्सेक्स’ची १,६२७ अंश कमाईसह भरपाई

मुंबई : सलग चार दिवस सुरू राहिलेल्या भयंकर पडझडीनंतर, शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ‘सेन्सेक्स’ने जागतिक भांडवली बाजाराची री ओढत उभारी दर्शविली. करोनाच्या प्रादुर्भावाने साधलेल्या आर्थिक दुष्परिणामांचा मुकाबला म्हणून सरकारकडून प्रोत्साहनपर उपाय जाहीर केले जातील, या आशेने सेन्सेक्सने १,६२७ अंशांची झेप घेतली.

शुक्रवारी सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांची पावणेसहा टक्क्यांची उभारी ही मे २००९ नंतरची एका दिवसांतील सर्वोत्तम कमाई ठरली आहे. मात्र सरलेल्या सप्ताहातील भयानक पडझडीत सेन्सेक्स १२ टक्क्यांनी गडगडला असून, हा मागील दशकातील बाजाराचा सर्वाधिक पडझडीचा सप्ताह ठरला आहे. शुक्रवारी बाजारातील व्यवहार आटोपले तेव्हा सेन्सेक्स १,६२७ अंश (५.७५ टक्के) उसळीसह २९,९१५ वर स्थिरावला, तर निफ्टी ४८२ अंशांच्या (५.८३ टक्के) वाढीसह ८,७४५चा स्तर गाठला. साप्ताहिक तुलनेत सेन्सेक्स ४,१८७.५२ अंशांची (१२.१५ टक्के) तर निफ्टी १,२०९.७५ अंशांची (१२.१५ टक्के) साप्ताहिक घसरण होऊन बंद झाले.

जागतिक बाजारातील सकारात्मकता यासह, गुरुवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्याप्रमाणे करोनाच्या कहराचा मुकाबला करण्यासाठी अर्थमंत्र्यांच्या नेतृत्वात कृती दलाच्या स्थापनेच्या घोषणेने बाजाराला आशेचा किरण दिसून आला. या कृतीदलाची शुक्रवारी झालेल्या बैठकीतून काही अर्थप्रोत्साहक उपायांच्या घोषणेसह, करोनामुळे त्रस्त उद्योगक्षेत्राला दिलासा दिला जाईल, अशा अपेक्षेने बाजारात खरेदीत जोर दिसून आला. बाजारात खरेदीच्या उत्साहाने सेन्सेक्स एकेसमयी २,१२९.९७ अंशांची भरारी घेत, ३०,४१८.२० पर्यंत झेपावला होता. तर दिवसातील त्याचा २७,९३२.६७ हा नीचांक स्तर पाहता, संपूर्ण सत्रात सेन्सेक्सचे जवळपास अडीच हजार अंशांमध्ये हिंदोळे सुरू होते.

विशेषत: आशियाई आणि युरोपीय बाजारातील सकारात्मक कलाशी सुसंगत आणि तांत्रिक विश्लेषणाच्या संकेतांच्या आधारे दिसून आलेली ही तेजी असून, मूलभूत दृष्टिकोनात बदलातून ही तेजी परतलेली नाही, याची गुंतवणूकदारांनी दखल घ्यावी, अशी प्रतिक्रिया जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधनप्रमुख विनोद नायर यांनी दिली. जगभरात विविध मध्यवर्ती बँकांकडून झालेली व्याजदर कपात आणि अर्थप्रोत्साहक उपायांच्या परिणामी प्रमुख जागतिक भांडवली बाजार निर्देशांकही जवळपास ४ टक्क्यांनी वधारले.

शुक्रवारी स्थानिक बाजारातील तेजीचे स्वरूप सर्वव्यापी होते. सर्वच क्षेत्रीय निर्देशांकांनी दमदार खरेदीचे पाठबळ मिळाल्याने सरशी साधली. तर छोटय़ा गुंतवणूकदारांचा पैसा गुंतलेल्या बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांनी ४.१८ टक्के इतकी वाढ साधली. आशियाई बाजारांमध्ये शांघाय, हाँगकाँग, सोल येथील निर्देशांकांनी तब्बल ७ टक्क्यांपर्यंत वाढ साधली. युरोपातील बाजारांनी प्रारंभिक सत्रात निर्देशांक पाच टक्के वाढीसह व्यवहार सुरू केले. उल्लेखनीय म्हणजे ब्रेन्ट क्रूडची वायदा किंमत ८.१८ टक्के वाढीसह प्रति पिंप ३०.८० डॉलपर्यंत वाढताना दिसले.