४,००० हजार कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या विद्युत दिवे व पंखे निर्मिती क्षेत्रातील सूर्या समूहाने आता विद्युत उपकरण निर्मिती क्षेत्रात उडी घेतली असून यामार्फत २०० कोटी रुपयांच्या उलाढालीचे लक्ष्य समूहाने राखले आहे. यानुसार समूहाने पहिल्या टप्प्यात वॉटर हीटर्स, रूम हीटर्स, ड्राय आयर्न, स्टीम आयर्न आणि मिक्सर ग्राइंडर ही उत्पादने सादर केली आहेत.
याबाबत सूर्या रोशनीचे व्यवस्थापकीय संचालक राजू बिस्ता यांनी सांगितले की, समूहाच्या देशभरात विस्तारलेल्या किरकोळ विक्री जाळ्याच्या माध्यमातून आतापर्यंत आम्ही विद्युत दिवे, पंखे या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून दिली आहे. आताही या नव्या गृहोपयोगी उपकरणांना किरकोळ विक्री जाळ्याच्या माध्यमातूनच चालना देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
दिवे व पंखे विक्रीप्रमाणेच नव्या उपकरणांनाही प्रतिसाद मिळेल, असे नमूद करून येत्या २ ते ३ वर्षांत कंपनी जवळपास २०० कोटी रुपयांच्या उलाढालीचे लक्ष्य साध्य करेल, असा विश्वासही बिस्ता यांनी व्यक्त केला.
विद्युत दिवे निर्मितीनंतर अलीकडेच सूर्या रोशनीने पंखे विक्री क्षेत्रात प्रवेश केला होता. युरोप आणि अमेरिकेसह जगभरातील ४४ देशांमध्ये सूर्याची उत्पादने निर्यात होतात.