टाटा डोकोमोमधील जपानी कंपनीचा सर्व हिस्सा खरेदी करण्यासाठी टाटा टेलिसव्‍‌र्हिसेसला लवकरच रिझव्‍‌र्ह बँकेची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. टाटा टेलिसव्‍‌र्हिसेस ही हिस्सा खरेदीची प्रक्रिया पार पाडत नसल्याबद्दल डोकोमोने हे प्रकरण आंतरराष्ट्रीय लवादात नेले आहे.
हिस्सा खरेदीसाठी टाटा टेलिसव्‍‌र्हिसेसने रिझव्‍‌र्ह बँकेकडे गेल्याच महिन्यात परवानगी मागितली होती, मात्र यावर केंद्रीय अर्थ खात्याचे मत विचारात घेण्याच्या प्रतीक्षेत रिझव्‍‌र्ह बँक आहे. ही प्रतीक्षा आता संपली असून टाटा टेलिसव्‍‌र्हिसेसला लवकरच परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे.
टाटा समूहातील टाटा टेलिसव्‍‌र्हिसेसमार्फत डोकोमो ही जीएसएम तंत्रज्ञानावर आधारित दूरसंचार सेवा पुरविली जाते. उपकंपनीत जपानच्या एनटीटी डोकोमोचा २६.५ टक्के, तर उर्वरित टाटा समूहाचा हिस्सा आहे. भारतीय दूरसंचार क्षेत्रात प्रवेश करतेवेळी २००९ मध्ये उभय कंपन्यांच्या व्यवसायाला प्रारंभ झाला, मात्र अपेक्षित महसुली उत्पन्न मिळत नसल्याने डोकोमोने बाहेर पडण्याचा निर्णय जुलै २०१४ मध्ये जाहीर केला. डोकोमोचा कंपनीतील हिस्सा खरेदीसाठी नवा भागीदार मिळत नसल्याने हा तिढा वाढला.
 लूप मोबाइल भारती एअरटेल खरेदी करण्याच्या हालचालीदरम्यान टाटा टेलिसव्‍‌र्हिसेस व व्होडाफोनदरम्यानची चर्चाही जोर धरू लागली, मात्र प्रत्यक्षात तसे काहीही झाले नाही. या प्रकरणात डोकोमो लवादात गेल्याने टाटा टेलिसव्‍‌र्हिसेसने नोव्हेंबरमध्ये या हिस्सा खरेदीसाठी अखेर रिझव्‍‌र्ह बँकेकडे परवानगी मागितली. टाटा टेलिसव्‍‌र्हिसेसला दूरसंचार कंपनीतील २६.५ टक्के हिस्सा खरेदी करण्यासाठी ५८ रुपये प्रति समभाग दराने ७,२५० कोटी रुपयांची गरज लागणार आहे.