टाटा समूहातील अब्जाधीश आणि देशातील अग्रेसर माहिती तंत्रज्ञान कंपनी टीसीएसने (टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेस) नुकत्याच संपलेल्या तिमाहीत तब्बल २४ टक्के वाढ राखत भक्कम नफ्याची नोंद केली आहे. कंपनीचा हा करोत्तर नफा विश्लेषकांच्या अंदाजापेक्षा किती तरी अधिक आहे. अमेरिकन चलनाची भक्कमता कंपनीच्या चांगलीच पथ्यावर पडली आहे. कंपनीने आगामी प्रवासाबद्दल मात्र कोणतेही भाष्य केलेले नाही.
टीसीएसने जुलै ते सप्टेंबर या चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीत ४,७०२ कोटी रुपये नफा कमाविला आहे. वार्षिक तुलनेत ही वाढ २३.८६ टक्के आहे. तर याच कालावधीत महसुलातील भरही ३४.३ टक्के आहे. कंपनीला एकूण २०,९७७ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. गेल्या नऊ महिन्यांतील ही चमकदार कामगिरी ठरली आहे. कंपनीला ४,५०० कोटींच्या आसपास नफा व २०,८०० कोटी रुपये महसूल मिळण्याचा अंदाज अनेक विश्लेषकांनी व्यक्त केला होता.
टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक एन. चंद्रशेखरन यांनीही कंपनीच्या यंदाच्या ताळेबंदाला अमेरिकेसारख्या देशातील व्यवसायाचा लाभ झाल्याचे नमूद केले आहे. यंदाच्या एकाच तिमाहीत कंपनीने १० कोटी डॉलरचा व्यवसाय देणारे २२ ग्राहक जोडले आहेत. तिमाहीत परकी चलनाच्या रूपाने महसुलातील वाढही ५.४ टक्के झाली असून ती ३३३.७० कोटी डॉलर राहिली आहे. कंपनीच्या व्यवसायाने उत्तर अमेरिकेत ३.६८ टक्के तर युरोप व ब्रिटनमध्ये अनुक्रमे १९.३ टक्के व ७.३ टक्के वाढ नोंदविली आहे. युरोपात टीसीएसने ताब्यात घेतलेल्या एल्टी कंपनीमुळे यंदा १.२ टक्के अधिक महसूल मिळाला आहे.