तब्बल ९० टक्क्यांपर्यंत वाढलेली मौल्यवान धातूंची आयात आणि चार महिन्यांनंतर नकारात्मक स्थितीत आलेल्या निर्यातीने देशातील व्यापार तूट चिंताजनक स्थितीत आणून ठेवली आहे. मे महिन्यात १.१ टक्के निर्यात घसरल्याने भारताची या कालावधीतील व्यापार तूट २० अब्ज डॉलरच्या पल्याड गेली आहे. सध्याची व्यापार तूट ही ऑक्टोबर २०१२ मधील २१ अब्ज डॉलरच्या ऐतिहासिक तुटीच्या काठावर आहे.
चालू खात्यातील तूट कमी करण्यासाठी मौल्यवान धातूच्या आयातीवर अंकुश आणणाऱ्या सरकारने विशेष क्षेत्रातील सोने-चांदीच्या निर्यातीवर आणलेले र्निबध विपरीत परिणाम करते झाले आहेत. या क्षेत्रातील सोने निर्यात मेमध्ये घसरून ०.८ अब्ज डॉलर झाली आहे.
विशेष आर्थिक क्षेत्रातील सोन्यावरील व्यवहार स्थगित केल्याने मुख्यत: निर्यातीवर विपरीत परिणाम झाल्याचे केंद्रीय वाणिज्य सचिव एस. आर. राव यांनी म्हटले आहे. संबंधित क्षेत्रातील व्यवहार पुन्हा खुले केले गेल्याने जूनमधील निर्यात पूर्वपदावर येईल, असा विश्वासही राव यांनी व्यक्त केला आहे.
व्यापार तुटीने गेल्या सात महिन्यांतील उच्चांक नोंदविला आहे. मेमध्ये ती २०.१ अब्ज डॉलर झाली आहे, तर निर्यातही चार महिन्यांनंतर मेमध्ये पुन्हा खालावली आहे. युरो झोनमधील कमी मागणीमुळे वर्षभरापूर्वीच्या २४.७८ अब्ज डॉलरच्या तुलनेत यंदाच्या मेमध्ये देशातील निर्यात २४.५१ अब्ज डॉलर नोंदविली गेली.
याच दरम्यान देशासाठी चिंताजनक बनलेली सोने-चांदीची आयात मात्र ८.३९ अब्ज डॉलरने वाढली आहे. एप्रिल व मे २०१३ मधील एकत्रित मौल्यवान धातू आयात १०९ टक्क्यांनी वाढून १५.८८ अब्ज डॉलर झाली आहे. मेमधील एकूण आयात ६.९९ टक्क्यांनी उंचावून ४४.६५ अब्ज डॉलर झाली आहे, तर चालू आर्थिक वर्षांतील पहिल्या दोन महिन्यांतील निर्यात अवघ्या ०.२१ टक्क्यांनी उंचावली आहे. या कालावधीतील निर्यात ८६.६ अब्ज डॉलर राहिली आहे.