चीनमधील आर्थिक मंदी आणि अमेरिकेतील व्याज दरातील वाढीसारख्या प्रतिकूल बाह्य़ घडामोडींवर कटाक्ष हवा आणि त्यांना अनुषंगूनच देशांतर्गत धोरणे काळजीपूर्वक आखली जायला हवीत, असे मत रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केले. तथापि बाह्य़ घडामोडींच्या परिणामी संभवणाऱ्या अस्थिरतेला हाताळण्याइतकी भारताची स्थिती मजबूत असल्याचाही त्यांनी निर्वाळा दिला. अमेरिकेच्या फेडरल रिझव्‍‌र्हकडून गेल्या आठवडय़ात झालेल्या पाव टक्क्य़ांच्या व्याज दर वाढीनंतर गव्हर्नर राजन यांच्याकडून पहिल्यांदाच व्यक्त झालेली ही प्रतिक्रिया आहे. बुधवारी मध्यवर्ती बँकेकडून प्रकाशित ‘वित्तीय स्थिरता अहवाल’ सादर करताना ते म्हणाले, ‘आपण (आव्हानांच्या मुकाबल्यात) सुस्थितीत निश्चितच आहोत. पण देशांतर्गत संभाव्य चलनवाढीच्या संकटाबाबत आपल्याला दक्ष राहायलाच हवे.’