बाजारसंलग्न विम्याची योजना असलेली युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन (युलिप) सध्या चर्चेत आहेत. संपत्ती निर्मिती आणि संरक्षण असा दुहेरी लाभ युलिप देत असतात. त्यामुळे हे दीर्घकालीन वित्तीय साधन आहे. म्हणूनच दीर्घकालीन भांडवली लाभ कराच्या पाश्र्वभूमीवर युलिप्सची बाजू उजवी ठरते.

युलिपकडे  याआधी महाग व कमी परतावा देणारा गुंतवणुकीचा पर्याय म्हणून पाहिले जायचे आणि ग्राहक या पर्यायात गुंतवणूक करायला कचरत असत. पण डिजिटल तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे हे उत्पादन किमतीच्या दृष्टीने जास्त किफायतशीर झाले आहे. उत्पादन नावीन्यामुळे या गुंतवणूक प्रकाराला कलाटणी मिळाली आहे.

या गुंतवणूक प्रकारात स्थिर आणि सतत वृद्धी दिसून आली आहे. गेल्या पाच वर्षांत खाजगी विमा कंपन्यांना प्राप्त झालेल्या नवीन व्यवसायातून प्रीमियममध्ये वार्षिक सरासरी ३८ टक्के दराने वाढ झाली आहे. यातून हे स्पष्ट दिसून येते की आजच्या ग्राहकांसाठी युलिप हा आकर्षक पर्याय ठरत आहे.

डिजिटल लाटेने विमा उद्योगात बदलाला सुरुवात झाली; ज्यात ग्राहक आणि विमा कंपन्यांत थेट संवाद सुरू झाला. ग्राहकांच्या अंतरंगात झटपट जाण्याची क्षमता असल्याने त्या उत्पादन नावीन्यपूर्ण पद्धतीने देऊ  शकतात.

ऑनलाइन वितरणाने पॉलिसी मिळवण्याचा आणि देखभालीसाठीच्या खर्चात बऱ्यापैकी घट झाली आहे. विमा कंपन्या आणखी नावीन्य आणत असल्याने आणि ग्राहकांसाठी सर्वोत्तम पर्याय शोधत असल्याने युलिपने येत्या काळात हा चढता क्रम कायम राखणे अपेक्षित आहे.

  • आर्थिक पोर्टफोलिओत युलिपचा समावेश करावा का?

याचे उत्तर होय आहे! फंडांचे विविध पर्याय जोखमीच्या पातळीनुसार मिळतात आणि कोणत्याही खर्चाविना फंड बदलण्याची लवचीकता मिळू शकते, असे नवीन पिढीचे स्वस्त युलिप ग्राहकांनी खरेदी करावेत. या लवचीकतेमुळे गुंतवणूकदारांना बाजारातील वृद्धीचा फायदा मिळताना आणि बाजारातील मंदीतून सुटका होऊन स्थिर संपत्ती वाढीची संधी मिळू शकते. पाच वर्षांचा बंधनकारक ‘लॉक इन’ काळ वित्तीय शिस्तीला पूरक असण्यासह उच्च परतावाही शक्य करतो.

या सगळ्या वैशिष्टय़ांमुळे गेल्या पाच वर्षांत युलिपची सातत्यपूर्ण आणि चांगली कामगिरी झाली आहे. मीडियम लार्ज कॅप प्रकारात गेल्या दीर्घकालीन भांडवल लाभ कराची गणना केल्यावर पाच वर्षांतील कामगिरी १६.५% इतकी आहे, पुढे जाताना युलिप्स परताव्याला आणखीन उत्तेजन मिळणार आहे.

कोणत्याही इतर वित्तीय उत्पादनाप्रमाणे युलिपची खरेदी करताना पूर्ण संशोधन आवश्यक आहे. युलिप योजना घेण्याचा विचार करणाऱ्यांसाठी मार्गदर्शक मुद्दे:

  • तुमचे ध्येय निश्चित करा

युलिप दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी, मुलांचे भविष्य संरक्षित करण्यासाठी किंवा निवृत्ती नियोजन यासाठी सुयोग्य पर्याय आहे. भविष्यातील निराशा टाळण्यासाठी गुंतवणुकीमागील तुमचे ध्येय तुम्ही ठरवणे हे खूप महत्त्वाचे आहे.

  • तुमची जोखीम घ्यायची तयारी ओळखा

तुमची जोखीम घ्यायची तयारी जोखून, युलिप आपणहून अ‍ॅसेट अलोकेशन निश्चित करेल. तुम्ही जर जोखीम घ्यायला तयार नसाल आणि तुमचा पैसा अस्थिर मत्तेत गुंतवायचा नसेल तर जास्त पैसा रोखे गुंतवणुकीसाठी वळता केला जाईल. त्याचप्रमाणे जर तुम्ही बाजारातील चढउतारांची चिंता करत नसाल तर जास्त वाटप समभागांमध्ये होईल.

  • गुंतवणुकीचा नियत फेरआढावा

काही उत्पादनात तुमचे वय जसे वाढत जाते, त्याला अनुसरून मत्तेचे आपोआप संतुलन होते. जसे वय वाढते आणि योजनेची समाप्ती जवळ येते तसे मत्तेचे वाटप जोखीम असलेल्या मत्तेतून अल्प जोखमेच्या पारंपरिक मत्तेत केले जाते. साधारणपणे एखाद्याची जोखीम घ्यायची तयारी वयानुसार कमी होते आणि हा लाभ खूप कदाचित महत्त्वाचा ठरू शकतो.

  • गुंतवणुकीचा कालावधी

तुमची जोखीम घेण्याची तयारी नाही हे माहिती असल्यास तुम्ही या साधनात किती पैसा टाकणार आहात हे ठरविणे आवश्यक आहे. यातून तुमचा गुंतवणुकीचा काळ ठरवणे शक्य होईल.

  • तुलना

विचारपूर्वक निर्णय घ्या. योजनेचा काळ, लाभ आणि मर्यादा अशा विविध बाबींचा विचार करून सर्व उत्पादनांची तुलना करा. कमी खर्च का आहे याचा आणि उत्पादनातून तुम्हाला काय लाभ होत आहे याचा अंदाज घ्या. कंपनीच्या निधी व्यवस्थापनाच्या पद्धतीचा आणि त्याचा परतावा याआधी किती राहिला आहे याचा काळजीपूर्वक अभ्यास करा. एका नव्हे तर सर्व निधीच्या कामगिरीचा अभ्यास तपासा.