जेटली यांचा खुलासा

ऊर्जित पटेल यांना रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरपदाचा राजीनामा देण्यास सरकारने सांगितले नाही, असे नमूद करताना अर्थमंत्री अरुण जेटली यांनी, चालू आर्थिक वर्षांत रिझव्‍‌र्ह बँकेच्या राखीव निधीमधून सरकारला एकही पैसा अपेक्षित नाही, असा दावाही केला.

मंगळवारी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात  बोलताना, काही मुद्दय़ांवर सरकार व रिझव्‍‌र्ह बँकेत मतभेद असले तरी त्यावरून गव्हर्नर पटेल यांना राजीनामा देण्यास सांगितले, असा निष्कर्ष काढणाऱ्या चर्चेत तथ्य नसल्याचे जेटली म्हणाले.

रिझव्‍‌र्ह बँकेच्या राखीव निधीमध्ये सरकारला रस असल्याचे सर्वप्रथम रिझव्‍‌र्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी जाहीरपणे सांगितले. त्यानंतर सरकारवर टीका होऊ लागली. वित्तीय तूट कमी करण्यासाठी या निधीचा वापर करण्याची शक्यता निर्माण झाली.