कुणा उद्योगसमूह अथवा बँकेद्वारे प्रवर्तित करण्यात न आलेली देशातील एकमेव मालमत्ता व्यवस्थापन कंपनी म्हणून यूटीआय म्युच्युअल फंडाचा एक स्वतंत्र बाणा आजवर जपला गेला असून, प्रस्तावित प्रारंभिक खुल्या भागविक्रीतून (आयपीओ) तो आणखी सशक्त बनविला जाईल, असा विश्वास या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक लिओ पुरी यांनी व्यक्त केला.
भारतातील सर्वात जुन्या मालमत्ता व्यवस्थापन कंपनी ही देशातील एकमेव स्वतंत्र वित्तीय संस्थाही आहे, याचा आपल्याला अभिमान असल्याचे पुरी यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले. सुमारे ९६,००० कोटी रुपये गुंतवणूकयोग्य गंगाजळी हाताळणाऱ्या देशातील पाचव्या क्रमांकाच्या मालमत्ता व्यवस्थापन कंपनीने दुसऱ्यांदा ‘आयपीओ’साठी सुसज्जता केली असून, त्या संबंधाने केंद्रीय अर्थमंत्रालयाची मंजुरीची तिला प्रतीक्षा आहे.
आयपीओतून संभाव्य फायद्यांबाबत विवेचन करताना, लिओ पुरी म्हणाले की, कंपनीतील व्यक्तिगत किरकोळ भागधारकांची संख्या वाढेल, व्यवस्थापनात व्यावसायिकता आणि कारभाराचा ढाच्यात व्यापकता येण्याबरोबरच, एकूण कामगिरीबाबत उत्तरदायित्वही वाढेल. ते म्हणाले, ‘आमचा कारभार निश्चितच पारदर्शी व उत्तरदायी बनेल. आम्ही कशी कामगिरी करीत आहोत यावर लोकांची नजर असेल आणि त्यानुसार आमचे स्थान निश्चित केले जाणार असल्याने त्याबाबत आम्हाला कायम दक्ष राहावे लागेल.’
जगभरात सर्वत्रच सर्वोत्तम मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांचे रूप हे स्वतंत्रच आहेत, असे नमूद करून पुरी म्हणाले, ‘उद्योगघराणी अथवा बँकांद्वारे प्रवर्तित अन्य कंपन्याच्या तुलनेत आम्ही आमचा कारभार कसा चालवतो आणि कंपनीचे व्यवस्थापन कसे आहे या दोन्ही गोष्टीत आम्हाला सुदैवाने भरपूर स्वातंत्र्य आहे.’ आगामी काळात आपल्या देशाच्या वित्तीय क्षेत्रातही या संबंधाने संक्रमण घडून येईल आणि यूटीआयचे सध्याचे रूप हे त्या दृष्टीने एक आदर्श व अनुकरणीय मॉडेल म्हणून वापरात येईल, असाही त्यांनी दावा केला.