सार्वजनिक क्षेत्रातील युनायटेड बँक ऑफ इंडियामार्फत ‘निर्ढावलेला कर्जदार’ असा शिक्का बसल्याबद्दल प्रथमच जाहीर नाराजी व्यक्त करीत किंगफिशर एअरलाइन्सचे विजय मल्या यांनी बँकेच्या या कारवाईबद्दल कायदेशीर पावले उचलली जातील, असे स्पष्ट केले.
मल्या प्रवर्तक असलेली आणखी एक कंपनी युनायटेड ब्रुअरिजच्या भागधारकांची १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी बंगळुरात पार पडली. या वेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना या उपाययोजनेचे संकेत दिले. बँकेने आपल्याविरुद्ध केलेली कारवाई चुकीची असल्याचा दावाही त्यांनी या वेळी केला.
सार्वजनिक क्षेत्रातील युनायटेड बँक ऑफ इंडियाने पुढाकार घेत किंगफिशर एअरलाइन्सचे मल्या यांना सोमवारी ‘निर्ढावलेले कर्जदार’ म्हणून जाहीर करण्यात आले होते. बँकेच्या निवारण समितीने याबाबतची कार्यवाही केली आहे. याविरोधात कंपनी न्यायालयातही गेली आहे.
मल्या म्हणाले की, युनायटेड बँक ऑफ इंडियाने आपल्या कंपनीविरुद्ध घेतलेली भूमिका ही चुकीची असून त्यांचे सर्व आक्षेप आपल्याला मान्य नाहीत. निवारण समितीला आढळून आलेल्या तथ्याबाबतही आपण साशंक आहोत. या समितीसमोर आपल्याला भूमिका मांडण्यास वाव मिळाला नाही. कंपनी बँकेविरुद्ध उचलावयाच्या पावलांसाठी कायदेशीर मार्ग काढणार आहे. यासाठी सर्व कायदेशीर बाजू पाहूनच आगामी निर्णय घेतला जाईल. भारतातील न्यायालयीन व्यवस्थेवर आपला पूर्ण विश्वास असून उपलब्ध सर्व कायदेशीर बाबी आपण अवलंबू, असेही मल्या म्हणाले.