साधे ७७ कोटी दिवे बदलणार
घरगुती कार्यक्षम दिव्यांच्या योजनेत सरकारने आतापर्यंत सहा कोटी एलईडी दिवे आतापर्यंत सवलतीच्या दरात वितरित केले असून, गेल्या वीस दिवसांत १ कोटी दिवे वितरित करण्यात आले, अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे.
एकूण ७७ कोटी साध्या दिव्यांच्या जागी एलईडी (लाइट एमिटिंग डायोड वापरलेले दिवे) दिवे निवासी क्षेत्रात बसवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.
एनर्जी एफिशियन्सी सव्र्हिसेस लिमिटेड या सरकारी ऊर्जा सेवा कंपनीने ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत देशातील अकरा राज्यांत एलईडी दिवे वितरित करण्याची योजना हाती घेतली आहे.
आज प्रसिद्धीस देण्यात आलेल्या निवेदनानुसार ईईसीएल कंपनीने वीस दिवसांत १ कोटी दिवे वितरित केले आहेत.
जानेवारीपर्यंत पाच कोटी दिवे वितरित करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले होते. एकूण सहा कोटी एलईडी दिवे वितरित करण्यात आल्याने विजेची सायंकाळची मागणी १८४८ मेगावॉट एवढी कमी झाली आहे.
या दिव्यांमुळे दिवसाला २ कोटी किलोवॉट तास इतकी ऊर्जा बचत होणे अपेक्षित आहे. वीज वाचल्याने पैसा वाचणार आहेत. एलईडी दिव्यांमुळे दिवसाला ८ कोटी रुपयांची बचत होणार आहे.
एलईडी दिव्यांचे फायदे
* दिवसाला २ कोटी किलोवॉट तास वीजबचत
* एक दिवसाला ८ कोटी रुपयांची बचत
* कार्बन उत्सर्जनात दिवसाला १७३५२ टनांची घट