मुंबई : भांडवली बाजारातील गुंतवणुकीतून चांगला पैसा कमावता येतो आणि तो टिकवताही येतो, याचा वस्तुपाठ घालून देणारे भारतातील सर्वात श्रीमंत आणि मुरब्बी गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे रविवारी सकाळी निधन झाले. ते ६२ वर्षांचे होत़े  त्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, विविध राजकीय नेते आणि उद्योग जगतातील अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला.

झुनझुनवाला यांचे रविवारी पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले, असे त्यांनी नव्याने स्थापन केलेल्या ‘आकासा एअर’मधील सूत्रांकडून सांगण्यात आले.  इस्केमिक हृदयविकार आणि मूत्रिपडाच्या आजारामुळे गेल्या काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. आठवडय़ापूर्वी, रविवार, ७ ऑगस्टला मुंबई ते अहमदाबाददरम्यान पहिल्या उड्डाणासह ते प्रवर्तक असलेल्या ‘आकासा एअर’च्या झालेल्या उद्घाटनानिमित्त मोठय़ा कालावधीनंतर ते सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमात ते व्हीलचेअरवर बसून सहभागी झाल्याचे दिसले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुले असे कुटुंब आहे.

गुंतवणुकीतून संपत्ती निर्मितीचे झुनझुनवाला यांचे कर्तृत्व, सामान्य गुंतवणूकदारांमध्ये त्यांच्याबद्दल वलय आणि आदर निर्माण करण्यास कारणीभूत ठरले. त्यांच्या गुंतवणुकीचा परिसस्पर्श झालेल्या अशा कंपन्यांमध्ये चढाओढीने गुंतवणूक केली जाण्याची प्रथाच निर्माण झाली होती. पाच हजार रुपयांच्या भांडवलासह सुरुवात करीत, सुमारे ४६,००० कोटी रुपयांच्या संपत्तीसह झुनझुनवाला यांनी ‘फोर्ब्स’च्या २०२१ सालच्या सूचीनुसार भारतातील ३६ व्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत अब्जाधीश म्हणून स्थान कमावण्यापर्यंत मजल मारली.

सनदी लेखापाल असलेल्या झुनझुनवाला यांचा जन्म मुंबईत सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील प्राप्तिकर अधिकारी होते. सिडनहॅम महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत असतानाच १९८५ मध्ये त्यांनी नातेवाईकाकडून कर्ज घेऊन भांडवली बाजारात पहिली गुंतवणूक केली. त्यावेळी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १५० वर होता.  झुनझुनवाला यांच्या मालकीची गुंतवणूक संस्था ‘रारे एंटरप्रायझेस’चे नाव त्यांच्या आणि पत्नी रेखा यांच्या नावांतील आद्याक्षरांवरून आले आहे.

झुनझुनवाला यांची तीन डझनहून अधिक कंपन्यांमध्ये गुंतवणूक असून, टाटा समूहातील कंपन्यांना त्यांनी विशेष स्थान दिले. त्यांची सर्वात मौल्यवान गुंतवणूक ही टाटा समूहाचा भाग असलेल्या घडय़ाळे आणि दागिने बनवणाऱ्या टायटनमध्ये आहे. मूल्य आणि पथ्याभिमुख कंपन्यांचे समभाग त्यांनी प्राधान्याने खरेदी केले. त्यांना भारताचे वॉरन बफे असे संबोधले जायचे. तथाकथित ‘क्रांतिकारी-नवयुगीन’ कंपन्यांच्या समभागांविषयी त्यांना फार ममत्व नव्हते.

शिस्त, पथ्यांविषयी बेफिकीर शेअर बाजारात पथ्यांविषयी जागरूक राहिलेले झुनझुनवाला स्वत:च्या आरोग्याविषयी आणि इतर पथ्यांविषयी मात्र कमालीचे बेफिकीर राहिले. अति धूम्रपान, प्रमाणाबाहेर मद्यपान आणि सातत्याने कुपथ्याचे अन्नसेवन या तीन सवयींनी त्यांना अखेरच्या काळात रुग्णावस्थेत नेले. त्यातून ते बाहेर येऊ शकले नाहीत.