मुंबई : खाद्यतेलासह विविध ग्राहकोपयोगी उत्पादनांच्या क्षेत्रात वेगाने विकास पावत असलेली ‘अदानी विल्मर लिमिटेड’ची प्रारंभिक समभाग विक्री येत्या २७ जानेवारीपासून खुली होत असून गुंतवणूकदारांना ३१ जानेवारीपर्यंत अर्ज करता येईल.

वैयक्तिक गुंतवणूकदारांना प्रति समभाग २१८ रुपये ते २३० रुपये समभागांसाठी बोली लावता येईल. किमान ६५ आणि त्यानंतर ६५ च्या पटीत समभागांसाठी अर्ज करून ते भागविक्रीत सहभागी होऊ शकतील.

अदानी विल्मर अहमदाबादस्थित अदानी समूह आणि सिंगापूरचा विल्मर समूह यांच्यातील संयुक्त भागीदारीतील कंपनी आहे. कंपनी देशात ‘फॉच्र्युन’ नाममुद्रेअंतर्गत खाद्यतेल विक्री करते. सुरुवातीला समभाग विक्रीच्या माध्यमातून ४,५०० कोटी रुपये उभारण्याचे नियोजन होते. मात्र त्यानंतर कंपनीने भागविक्रीचे आकारमान कमी करून या माध्यमातून ३,६०० कोटी रुपयांचा निधी उभारण्याचे प्रस्तावित केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कंपनीचे प्रवर्तक आणि विद्यमान भागधारक त्यांच्या भांडवली हिश्शाची या माध्यमातून विक्री करणार नसून, केवळ नवीन समभागांची विक्री केली जाणार आहे. यातून कंपनीचा ३,६०० कोटी रुपयांचा निधी उभारण्याचा मानस आहे. आयपीओच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या निधीचा उपयोग भांडवली खर्चाची तरतूद, कर्जाची परतफेड, धोरणात्मक अधिग्रहण आणि व्यवसाय विस्ताराच्या गुंतवणुकीसाठी केला जाणार आहे.