एअरटेलद्वारे जिओच्या तोडीचे ब्रॉडबँड सेवांचे दर

मुंबई : रिलायन्सच्या जिओ फायबरला टक्कर देण्यासाठी एअरटेलने त्याच किमतीतील व त्याच वेगातील नवी ब्रॉडबँड योजना बुधवारी सादर केली. एअरटेलने एक्स्ट्रीम फायबर नावाने महिन्याला १ जीबीपीएस इंटरनेट सेवा ३,९९९ रुपयांना उपलब्ध करून दिली आहे. उभय कंपन्यांतील हे दरयुद्ध ग्राहकांसाठी फायद्याचे ठरणार आहे.

एअरटेल एक्स्ट्रीम फायबर ही घर तसेच छोटय़ा कार्यालयांमध्ये वापरता येण्यासारखी ब्रॉडबॅण्ड सेवा आहे. एअरटेलच्या ग्राहकांना अ‍ॅमेझॉन प्राइमची वर्षभरासाठी नोंदणीही मिळेल. तसेच झी ५ आणि एअरटेल एक्स्ट्रीम अ‍ॅपमधील मनोरंजनाचा स्वादही घेता येईल.

जिओच्या तिसऱ्या वर्धापनाला रिलायन्सने ब्रॉडबँड सेवेचा शुभारंभ केला. महिन्याला किमान ६९९ रुपये दर व १ जीबी इंटरनेट वेग अशी वैशिष्टय़े असलेल्या सेवेद्वारे इंटरनेट, सेट टॉप बॉक्स, दूरचित्रवाणी संच आदींची भेट ग्राहकांना उपलब्ध करून दिली.

जून २०१९ अखेर भारतातील तारेने जोडणीद्वारे ब्रॉडबॅँड इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या १.८४ कोटींवर पोहोचली आहे.