scorecardresearch

सहकारी संस्थांमधील निवडणूक प्रक्रियेसाठी स्वतंत्र यंत्रणा ; केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडून सूतोवाच

निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या धर्तीवर स्वतंत्र यंत्रणा स्थापित करण्याचे त्यांनी सूतोवाच केले.

सहकारी संस्थांमधील निवडणूक प्रक्रियेसाठी स्वतंत्र यंत्रणा ; केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडून सूतोवाच
(संग्रहित छायाचित्र)

नवी दिल्ली : सहकारी संस्थेत वर्षांनुवर्षे एकाच व्यक्तीने निवडून येणे गैर असून, या संस्थांमधील निवडणूक प्रक्रिया अधिक खुली व पारदर्शक व्हायला हवी, असे नमूद करीत केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी सहकारी संस्थांमध्ये अधिकाधिक सुधारणा राबविण्याची आग्रही भूमिका मांडली. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या धर्तीवर स्वतंत्र यंत्रणा स्थापित करण्याचे त्यांनी सूतोवाच केले.

सरकारच्या ई-मार्केटप्लेस (जेम) व्यासपीठावर देशभरातून ऑनलाइन धाटणीने सहकारी संस्थांना सामावून घेण्याच्या कार्यक्रमात बोलताना, सहकार हे देशाच्या स्वातंत्र्यापासून आजतागायत ‘उपेक्षित’ ठरलेले क्षेत्र असून, या क्षेत्राचा विस्तार आणि आधुनिकीकरण करण्याची गरजही शहा यांनी प्रतिपादित केली. मोदी सरकारने नवीन सहकार मंत्रालयाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्या वर्षांत २५ ते ३० उपक्रम हाती घेऊन सहकार क्षेत्रात वेगाने बदल घडवून आणण्याला सुरुवात केली, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

‘आम्हाला बदलावे लागेल, नाहीतर लोक आपल्यालाच बदलतील,’ असे त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित सहकारातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना उद्देशून सांगितले. शहा यांनी सहकार क्षेत्रातील कारभाराच्या सर्व क्षेत्रांत, विशेषत: निवडणूक प्रक्रियेसह तीन क्षेत्रांमध्ये पारदर्शकता आणण्यावर भर दिला पाहिजे असे सांगितले.

निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकतेच्या दिशेने बदल घडवायचा आहे असे नमूद करीत, भारतीय निवडणूक आयोगाच्या धर्तीवर निवडणूक यंत्रणा उभारण्यात येणार असल्याचे शहा म्हणाले. केंद्रीय सहकार मंत्रालयाकडून या दिशेने नियम तयार केले जात आहेत, असेही त्यांनी सांगितले.

देशात सध्या ८.५ कोटी सहकारी संस्था असून, त्यांची एकूण सदस्यसंख्या २९ कोटींच्या घरात जाणारी आहे. या क्षेत्रात विकासाची प्रचंड क्षमता पाहता ही संख्या १०० कोटींहून अधिक होण्याची शक्यता आहे, असे शहा म्हणाले.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या