जगातील तिसऱ्या मोठय़ा अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करू पाहणाऱ्या भारतीय बाजारपेठेवर जगभरातील आरामदायी कार बनावट कंपन्यांचीही नजर असल्याचे ‘ऑटो एक्स्पो’च्या पहिल्या दिवसातील चित्रावरूनच स्पष्ट झाले. भारतीयांची वाढणारी क्रयशक्ती, आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डबाबतची उस्तुकता यामुळे मर्सिडिज, ऑडी, बीएमडब्ल्यूसह अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी येथे भरलेल्या वाहन मेळाव्यात आपला सक्रीय सहभाग नोंदविला आहे.
दशकातील सुमार विक्री नोंदविणाऱ्या २०१३ नंतर भारतीय वाहन उद्योगाला नव्या वर्षांपासून मोठय़ा आशा आहेत. त्यासाठीच नव्या वाहनांची जोड देण्याचे त्यांच्याकडून चाचपले जात आहे. हेही येथील प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसातून स्पष्ट होत आहे. मर्सिडिज बेन्झनेही देशात येत्या वर्षभरात स्पोर्ट यूटिलिटी, कॉम्पॅक्ट एसयूव्ही तसेच सेदान श्रेणीतील वाहन सादर करण्याचा मनोदय या व्यासपीठावरून सादर केला. जर्मन बनावटीच्याच बीएमडब्ल्यूचीही विजेरी मोटारही प्रदर्शनाचे आकर्षण बनली आहे. कंपनीने एकदम चार वाहने सादर केली आहेत. टाटा मोटर्सकडे असलेल्या जग्वार लॅण्ड रोव्हर या ब्रिटिश ब्रॅण्डच्याही दोन कार यावेळी सादर करण्यात आल्या.
मोटारीच्या डिझाईनसाठी ओळखले जाणाऱ्या दिलीप छाब्रिया यांनी तीन विविध प्रकारच्या श्रेणीतील वाहन प्रकाराद्वारे वाहन निर्मितीत थेट प्रवेश करत असल्याचे दिसून आले. अवंती ही भारतीय बनावटीची पहिली स्पोर्ट कार येत्या सप्टेंबरमध्ये रस्त्यावरून धाऊ लागेल, असा मनोदयही त्यांनी यावेळी व्यक्त केला. हा वाहन मेळा असला तरी येथे चित्रपट, क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती लक्षणीय ठरली.
क्रिकेटचा ‘भारतरत्न’ सचिन तेंडुलकर हा तर या एक्स्पोचा विशेष पाहुणा ठरला. मग उपस्थितांनीही कारऐवजी त्याच्याबरोबर छायाचित्र काढून घेण्यातच क्षण वेचले. अभिनेत्री प्रियांका चोप्रा तर जग्वार लॅण्ड रोव्हरच्या भल्या मोठय़ा गाडीच्या थेट बोनेटवर विराजमान झाली. दिल्लीचे सासर असलेल्या करिष्मा कपूरनेही येथे हजेरी लावली.

२००८ चा नवी दिल्लीतील ऑटो एक्स्पो रतन टाटा यांच्या स्वप्नातील लाख रुपयांच्या नॅनो कारमुळे उजळून निघाला होता. समूहाची सूत्रे हाती आल्यानंतर प्रथमच अध्यक्ष सायरस मिस्त्री हे बुधवारपासून ग्रेटर नोएडा येथे सुरू झालेल्या प्रदर्शनास उपस्थित राहिले. नेक्सॉन या नव्या वाहनासह ते यावेळी छायाचित्रकारांच्या लखलखाटाला सामोरे गेले. टाटा मोटर्सनेही या माध्यमातून वेगाने वाढू पाहणाऱ्या कॉम्पॅक्ट स्पोर्ट यूटिलिटी वाहन श्रेणीत शिरकाव केला आहे. नवी दिल्लीबाहेर होणाऱ्या यंदाच्या प्रदर्शनात याच वाहन प्रकारावर कंपन्या भर देत आहेत.
कॉम्पॅक्ट/एसयूव्ही स्पर्धेत याही.. फोक्सव्ॉगन (टॅगन), महिंद्र (हायब्रिड एक्सयूव्ही५००), शेव्हर्ले जनरल मोटर्स (अद्रा), ह्य़ुंदाई (सॅन्टे फे) (सध्या या क्षेत्रात फोर्डची इकोस्पोर्ट व रेनोची डस्टर एकमेकांच्या स्पर्धक म्हणून स्थिरावल्या आहेत.)